मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:56 IST2026-01-10T18:56:11+5:302026-01-10T18:56:49+5:30
पहाटे २ च्या सुमारास संग्राम पाटील त्यांच्या कुटुंबासह मुंबईत आले. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले

मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई - लंडनमध्ये राहणारे अनिवासी भारतीय डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतले. पहाटे लंडनहून मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने टीकात्मक लिखाण करत असल्याने पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्यावरील या कारवाईचा मानवाधिकार कार्यकर्ते वकील असीम सरोदे यांनी निषेध केला.
पहाटे २ च्या सुमारास संग्राम पाटील त्यांच्या कुटुंबासह मुंबईत आले. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. साधारण दुपारी ३ च्या सुमारास संग्राम पाटील यांना चौकशी करून सोडण्यात आले. याबाबत पत्रकारांशी बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, मी फेसबुकवरून सरकारविरोधात लिखाण करत असतो, त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत. त्यांनी पोलिसांकडे तक्रार करून एफआयआर केली होती. त्यामुळे आज मला पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशी करून संध्याकाळी मला नोटीस दिली असं त्यांनी सांगितले.
तसेच कुठल्या तरी एका राजकीय पक्षाची पोस्ट आहे. त्याच्यासोबत मला क्लब करून टाकले आहे. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतीचे आहे. मला त्यावर लगेच भाष्य करता येणार नाही. हा चौकशीचा भाग आहे. चौकशीतून निष्कर्ष काढला जाईल. मी सध्या थकलोय. साधारण ३५-४० तास प्रवास करून मी मुंबईत आलो. पहाटे २ पासून मला ताब्यात घेत चौकशी करत होते. मी माझी कायदेशीर बाबू तपासेन. तज्त्रांकडून सल्ला घेऊन मी माझा लढा लढेन असंही डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे २ वाजल्यापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवले होते. खरे तर हे अन्याकारक आणि छळवाद आहे. संग्राम पाटील हे लंडनमध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असं वाटते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये असं मानवाधिकार कार्यकर्ते असीम सरोदे यांनी म्हटलं.