मुंबई/मीरारोड : मीरा-भाईंदरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे वाहतूककोंडी वाढत असून, त्यावर ही कोंडी सोडवण्यास मीरा भाईंदरमधील डबलडेकर उड्डाणपूल हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. नियोजनपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या मीरा-भाईंदरमधील डबलडेकर उड्डाणपुलाचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी महामुंबई मेट्रोच्या अध्यक्ष रुबल अगरवाल, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त राधाबिनोद शर्मा उपस्थित होते. हा उड्डाणपूल मेट्रो मार्गिका-९चा भाग असून, दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर यांना तो जोडतो. तीन उड्डाणपुलांचा या प्रकल्पात समावेश आहे. या प्रकल्पांतर्गत तीन उड्डाणपुलांचा समावेश असून रस्ते जोडणी सुधारण्यासोबतच मेट्रोशी सुलभपणे जोडणी करण्यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.
फायदा काय?एस. के. स्टोन जंक्शन, कनाकिया जंक्शन आणि शिवार गार्डन जंक्शन ही वाहतूक कोंडी होणारी तीन प्रमुख ठिकाणी टाळता आल्याने उड्डाणपुलामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल.
रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना
वाहतूक अधिक सुरक्षित व्हावीत, यासाठी आरसीसी अँटी-क्रॅश बॅरिअर्स रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड, मार्गिकांच्या पट्ट्या आणि वेगमर्यादा निदर्शकांमुळे वाहतूक मार्गदर्शन
पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा
वेग नियंत्रित करण्यासाठी रॅम्पवर रंबल स्ट्रिप्स आणि गतिरोधक
रतन टाटा यांचे नाव
उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाला स्वर्गीय रतन टाटा उन्नत मार्ग असे नाव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तर प्लेझेंट पार्क ते साईबाबा नगर उड्डाणपुलाला 'धर्मवीर आनंद दिघे उन्नत मार्ग' आणि शिवार उद्यान सिग्नल ते गोल्डन नेस्ट सर्कलपर्यतच्या उड्डाणपुलास 'स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उन्नत मार्ग' अशी नावे देण्याचे निवेदन मंत्री सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी दिले.
मीरा-भाईंदरच्या रहिवाशांना अखंड आणि सुरळीत प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचे पाऊल ठरेल -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
दुसऱ्या स्तरावर लवकरच मेट्रो सेवा सुरू होत असल्याने मीरा-भाईंदरच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अनुभवायला मिळणार आहे - डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए