सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 04:15 AM2021-01-30T04:15:04+5:302021-01-30T06:30:29+5:30

सोमवारपासून होणार अंमलबजावणी : पण पीक अवरमध्ये प्रवासाची मुभा नाही

The door of the local was opened for all but now there is a time limit for the employees of the essential services | सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं

सर्वांसाठी लोकलचं दार उघडलं, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेचं बंधन घातलं

Next

मुंबई : कोरोनामुळे १० महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे. मात्र, प्रवासाच्या वेळा मर्यादित असतील.लोकल सेवा बंद असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सगळ्यांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच बैठक झाली होती.

प्रवास लांबला, तर काय करणार? 
सर्वसामान्य प्रवाशांनी रेल्वेच्या एखाद्या मार्गावर ठरलेल्या वेळेत प्रवास सुरू केला, पण त्यांचा प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा लांबला किंवा त्यांना दुसऱ्या मार्गावरून पुढचा प्रवास सुरू करायचा असेल आणि त्यातच त्यांना दिलेली प्रवासाची मुदत संपली, तर नेमके काय करायचे, याबाबतही रेल्वेने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या काही दिवसांत वेळेच्या मर्यादेवरून गोंधळ उडण्याची शक्यता असल्याचे प्रवाशांचे आणि प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. 

पासबाबत संभ्रम
गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून ज्या प्रवाशांचा रेल्वे पास शिल्लक आहे, त्यांना पासची मुदत वाढवून देण्याबाबत रेल्वेने अद्याप माहिती दिलेली नाही. याबाबत विचारता, पासच्या नूतनीकरणाबाबत सध्या भाष्य करता येणार नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

कधी प्रवास करता येईल?

  • सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत
  • तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत
  • रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

 

कधी येणार नाही?
सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. 
या वेळात फक्त यापूर्वी परवानगी दिलेले विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही बंधन
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आता सकाळी ७ ते १२ आणि दुपारी ४ ते ९ या वेळेतच प्रवास करता येईल. सर्वसामान्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत त्यांना प्रवास करता येणार नाही, असे पश्चिम आणि मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. 

Web Title: The door of the local was opened for all but now there is a time limit for the employees of the essential services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.