तुमची निष्ठा विकू नका, एकही जण फुटू देऊ नका, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 15:55 IST2025-12-29T15:54:35+5:302025-12-29T15:55:34+5:30
मी वाईट ठरलो तरी चालेल वाईटपणा मी घेतो, तुम्ही नका घेऊ. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल; पण तुम्ही तुमची निष्ठा कधीही विकू नका, अशी भावनिक साद ठाकरेंनी घातली.

तुमची निष्ठा विकू नका, एकही जण फुटू देऊ नका, उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन
मुंबई : तुमची निष्ठा विकू नका. या लढाईत आपल्यातील एकही माणूस फुटता कामा नये, असे भावनिक आवाहन उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. दादर येथील शिवसेना भवनात रविवारी सकाळी मुंबईतील शाखाप्रमुख, विभागप्रमुख, माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. उमेदवारांची यादी आज अंतिम केली जाईल असे सांगून उद्या सोमवारपासून उमेदवारांना एबी फॉर्म दिले जातील, असे संकेत त्यांनी दिले.
एक काळ असा होता की भाजपला कोणी ओळखत नव्हते. आम्ही त्यांना खेडोपाडी पोहोचवले. आज ज्यांना मोठे केले, तेच आमच्यावर वार करत आहेत. संघर्षातून मिळवलेली मुंबई आपल्याकडून हिसकावता येणार नाही. भाजपने केवळ युती तोडली नाही, तर शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.
मी वाईट ठरलो तरी चालेल वाईटपणा मी घेतो, तुम्ही नका घेऊ. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल; पण तुम्ही तुमची निष्ठा कधीही विकू नका, अशी भावनिक साद ठाकरेंनी घातली.
माजी महापौर भाजपात अन् उद्धवसेनेला आली जाग
नाशिक : ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन माजी महापौरदेखील भाजपात निघून गेल्यानंतर आता उद्धवसेनेला जाग आली आहे. पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे नाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली असून, ते साेमवारी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर उमेदवार निश्चित होतील.
नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्राचे संपर्क मंत्री असलेल्या खासदार संजय राऊत यांच्या काळात पक्षाची बरीच पडझड झाली आहे. त्यांनी पक्षात नव्याने आणून ज्यांना संधी दिली, अशा अनेक जणांनी पक्ष साेडला आहे.
...अन् उद्धवसेनेची काँग्रेसशी आघाडी करण्यास बोलणी
परभणी : महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिंदेसेना एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे काँग्रेस व उद्धव सेनेने घेतलेला बैठकीत सर्व प्रभागांमध्ये आघाडी करण्यास सकारात्मक बोलणी केली.
काँग्रेस व उद्धवसेनेची आज आघाडीसाठी बैठक झाली. आधी काँग्रेस केवळ दोन प्रभागात आघाडी करू शकल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, याबाबत महानगराध्यक्ष इनामदार यांना विचारले असता पूर्ण शहरात उद्धवसेनेसोबत आघाडी होणार असून, उद्या त्याची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले.