पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ देऊ नका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:58 IST2025-02-19T07:57:44+5:302025-02-19T07:58:25+5:30
पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. त्यावेळी गगराणी बोलत होते. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास सखल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी साचते.

पावसाळ्यात रेल्वे ठप्प होऊ देऊ नका !
मुंबई : पावसाळ्यात रुळांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी सर्व कामे चोखपणे पूर्ण करावीत. तसेच रेल्वे स्थानकांवर पावसाळापूर्व तयारीसाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरे करावेत, अशी सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठक महापालिका मुख्यालयात मंगळवारी पार पडली. त्यावेळी गगराणी बोलत होते. मुंबईत जोरदार पाऊस झाल्यास सखल भागांमध्ये, रेल्वे रुळांवर पाणी साचते. परिणामी, रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प होते. गेल्या काही वर्षांत ज्या ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणांचा स्थळनिहाय आढावा घेऊन कोणती कार्यवाही केली, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली.
स्थानकांबाबत झाली चर्चा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, माटुंगा कार्यशाळा, चुनाभट्टी, वडाळा, मिठी नदी (शीव-कुर्ला), ब्राह्मणवाडी नाला, टिळकनगर नाला, विद्याविहार स्थानक, कर्वेनगर नाला (कांजूर मार्ग), हरियाली नाला, संतोषी माता नाला, मारवाडी नाला, भांडुप स्थानक तसेच, पश्चिम रेल्वे विभागातील अंधेरी, बोरीवली येथे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची चर्चा झाली.
नाल्यांतून गाळ काढण्याचे काम वेळेत पूर्ण करा
पावसाळापूर्व सज्जता म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत.
आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करावी, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.