Don't hike taxis with rickshaws immediately; Need to reconsider! | रिक्षासह टॅक्सीची भाडेवाढ तूर्त नकाेच; फेरविचार गरजेचा; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

रिक्षासह टॅक्सीची भाडेवाढ तूर्त नकाेच; फेरविचार गरजेचा; मुंबई ग्राहक पंचायतीची मागणी

मुंबई : रिक्षा आणि टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी रिक्षा भाड्यात २.०१ आणि टॅक्सी भाड्यात २.०९ रुपयांनी वाढ सुचवणाऱ्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड. शिरीष देशपांडे यांनी राज्याचे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांना एका पत्राद्वारे केली. भाडेवाढ १ मार्चपासून अंमलात येणार असून, मीटर कॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे.

गेल्या पाच वर्षांहून जास्त कालावधीत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे ती अनिवार्य होती यात शंका नाही. रिक्षा, टॅक्सी मालक तसेच चालकांनाही सध्याच्या बिकट परिस्थितीत आर्थिक साहाय्याची गरज आहे यातही वाद नाही. परंतु कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, बऱ्याच जणांना पगारकपातीला तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य ग्राहकांची एकूण क्रयशक्ती मोठ्या प्रमाणावर खालावल्याने सुरुवातीच्या भाड्यातच थेट तीन रुपये वाढ आणि त्यानंतर प्रति किलोमीटरसाठी दोन रुपयांहून अधिक इतकी दरवाढ ग्राहकांच्या हालअपेष्टांत भर घालणारी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेघले.

परिणामत: ग्राहकांचा दैनंदिन रिक्षा, टॅक्सी वापर साहजिकच मोठ्या प्रमाणावर कमी होईल. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी मालक, चालकांना ‌दिलासा देण्याचा शासनाचा जो मूळ उद्देश आहे तो सफल होऊ शकणार नाही. किंबहुना हे वास्तव लक्षात घेऊनच खुद्द रिक्षा युनियननेसुद्धा सद्य:स्थितीत भाडेवाढ करू नये, अशी मागणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीनुसार असे सुचविले पर्याय

सद्यपरिस्थिती ही कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीस योग्य नसल्याने रिक्षा, टॅक्सीची १ मार्चपासून लागू होणारी दरवाढ सहा महिने पुढे ढकलावी. अथवा रिक्षा, टॅक्सी चालकांना भाडेवाढीद्वारे त्यांच्या उत्पन्नात वाढ करून देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रस्तावित भाडेवाढ ही ग्राहकांनासुद्धा सुसह्य होईल याची शासनाने काळजी घ्यावी आणि त्यासाठी सदर भाडेवाढ ही दोन ‌टप्प्यांत करून १ मार्चपासून पुढील वर्षासाठी रिक्षा आणि टॅक्सीच्या मूळ भाड्यात एक रुपया भाडेवाढ आणि पुढील‌ प्रत्येक किलोमीटरसाठी ७५ पैसे वाढ लागू करावी. उर्वरित भाडेवाढ एक वर्षाच्या कालावधीनंतर करावी.

केवळ मूळ भाड्यात २ रुपये सरसकट भाडेवाढ करून पुढील प्रति किलोमीटर २ रुपये १ पैसा आणि २ रुपये ९ पैसे ही दरवाढ येत्या वर्षभरासाठी स्थगित करावी. असे तीन पर्याय शासनाला सुचविले आहेत. एकंदरीत परिस्थितीचा साधक-बाधक विचार करून रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाबाबत वरील तीन पर्याय लक्षात घेऊन शासनाने फेरविचार करावा, अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहनमंत्र्यांना केल्याचे ॲड. शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Don't hike taxis with rickshaws immediately; Need to reconsider!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.