लोकलच्या दरवाजात लटकू नका; वाढते अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची मुंबईतील २५० सिनेमागृहांमध्ये जनजागृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:23 IST2025-12-18T12:22:50+5:302025-12-18T12:23:42+5:30
मुंबईकरांचा लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने जनजागृती अभियान राबवले आहे.

लोकलच्या दरवाजात लटकू नका; वाढते अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची मुंबईतील २५० सिनेमागृहांमध्ये जनजागृती
मुंबई : मुंबईकरांचा लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने जनजागृती अभियान राबवले आहे. लोकलच्या दरवाजात लटकू नका, असा संदेश आता थेट सिनेमागृहांच्या मोठ्या पडद्यावरून दिला जात आहे. पश्चिम रेल्वेने मुंबईतील सुमारे २५० चित्रपटगृहांमध्ये लोकप्रिय कार्टून पात्र 'छोटा भीम'चा अॅनिमेटेड व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली आहे.
हा व्हिडिओ चित्रपट सुरू होण्यापूर्वी तसेच मध्यंतरात प्रेक्षकांना दाखवला जात आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासातील सुरक्षेचे धडे अधिक आकर्षक आणि सोप्या पद्धतीने पोहोचावेत, यासाठी 'छोटा भीम' या कार्टून पात्राचा वापर करून हा व्हिडिओ तयार केला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम
लहान वयापासूनच मुलांमध्ये सुरक्षित प्रवासाची सवय रुजवणे, तसेच सर्वसामान्य प्रवाशांपर्यंतही हा संदेश मनोरंजक पद्धतीने पोहोचवणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरही प्रबोधनासाठी मोहीम
पश्चिम रेल्वेने या व्हिडिओचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे ३ लाख नागरिकांपर्यंत केला आहे. यासोबतच प्रिंट, डिजिटल, दूरदर्शन, रेडिओ, पोस्टर्स आणि शालेय कार्यक्रम अशा विविध माध्यमांतूनही ही मोहीम राबवली जात आहे.
आता त्याचाच भाग म्हणून सिनेमागृहांतूनही हा संदेश दिला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते, स्टंटबाजीवर आधारित चित्रपट पाहिल्यानंतर अनेक तरुण त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.
अशा चित्रपटांच्या वेळी हा जनजागृती व्हिडिओ दाखवून तरुण प्रेक्षकांपर्यंत सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
फूटबोर्डवर स्टंट करणे हिरोगिरी नाही, तर मूर्खपणा...
या अॅनिमेटेड व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनच्या फूटबोर्डवर निष्काळजीपणे स्टंट करणाऱ्या तरुणाला छोटा भीम वाचवताना दाखवला आहे. त्यानंतर तो सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देत म्हणतो, फूटबोर्डवर स्टंट करणे हिरोगिरी नाही, तर मूर्खपणा आहे. सुरक्षित प्रवासाचे नियम पाळले तरच खरे हिरो होता येते.