शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका; प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 10:33 IST2022-02-08T10:33:17+5:302022-02-08T10:33:27+5:30
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मैदानावर खेळ खेळले जावेत.

शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका; प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं परखड मत
मुंबई: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. लतादीदींच्या निधनानंतर दोन दिवसांनीच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे. दादरच्या ज्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं, अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. याचपार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील आपलं मत यावेळी व्यक्त केलं आहे.
प्रकाश आंबेडकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मैदानावर खेळ खेळले जावेत. शिवाजी पार्कवर अनेक शाळांचे, क्लबचे मॅचेस होतात. स्मारकाकरता इतर अनेक जागा आहेत. त्यामुळे या मागणीला माझा विरोध आहे. शिवाजी पार्क हे शिवाजी पार्कच राहिलं पाहिजे. त्याला स्मशानभूमी करू नये, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे भाजप आमदार राम कदम यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले होते. काही लोकांनी लतादीदींच्या स्मारकाची मागणी केली आहे. पण त्यांना मागणी करण्याची गरज नाही. लतादीदींच्या स्मारकाचं राजकारण करु नका, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला होता.
लता मंगेशकर यांचं स्मारक उभारणं ही काही इतकी सोपी बाब नव्हे. त्या काही राजनेता नव्हत्या. लतादीदी आपल्या आहेत, देशाच्या आहेत आणि जगाच्याही आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, अशाप्रकारचं लतादीदींच्या आठवणींना उजाळा देणारं स्मारक महाराष्ट्रात नक्की उभारलं जाईल. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार नक्की त्याचा विचार करेल. लता मंगेशकर या काही राजकीय पक्षाच्या पुढारी नव्हत्या. तो देशाचा अनमोल ठेवा होता, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.