"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:34 IST2026-01-11T13:30:33+5:302026-01-11T13:34:32+5:30
दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरांच्या नावावरून राजकीय युद्ध पाहायला मिळत आहे.

"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Tejasvi Ghosalkar: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्यात आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. "अभिषेक असता तर कोणाची हिंमत झाली नसती," या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना, "माझ्या पतीच्या नावाचा वापर करून उगाच प्रचार करू नका," अशा शब्दांत तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंना सुनावले आहे.
नेमका वाद काय?
दहिंसरमधील वॉर्ड क्रमांक २ च्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचारार्थ आलेल्या उद्धव ठाकरेंनी घोसाळकर कुटुंबातील फुटीवर भाष्य केले होते. "आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती. मला विनोद घोसाळकरांचा अभिमान आहे. मी तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात नाही, तर भाजपच्या फोडाफोडीच्या प्रवृत्तीला ठेचायला आलोय," असे विधान ठाकरेंनी केले होते. भाजपमुळेच घोसाळकर कुटुंबात भांडणे लागल्याचा थेट आरोपही त्यांनी केला होता.
'तो माझा नवरा, मी काहीही करू शकते'
उद्धव ठाकरेंच्या या आरोपांना तेजस्वी घोसाळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे उत्तर दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, "मी आणि अभिषेकने नेहमीच सर्व निर्णय मिळून घेतले होते. आज अभिषेक असते तरी आम्ही दोघांनी मिळूनच जो निर्णय घेतला असता, तोच मी घेतला आहे. मला असे वाटते की अभिषेक आजही माझ्यासोबतच आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अभिषेकच्या नावाचा आणि निष्ठेचा वापर करून राजकारण करणे चुकीचे आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "अभिषेक माझे पती आहेत, त्यांचे नाव घेऊन मी काहीही करू शकते, तो माझा वैयक्तिक अधिकार आहे. पण प्रचारासाठी त्यांचे नाव मध्ये ओढणे थांबवावे."
राजकीय पार्श्वभूमी आणि सत्तासंघर्ष
माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून आणि दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. फेब्रुवारी २०२४ मध्ये अभिषेक घोसाळकर यांची निर्घृण हत्या झाली होती, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांच्या निधनानंतर घोसाळकर कुटुंबात राजकीय मतभेद निर्माण झाले.
हत्या प्रकरणाच्या काही काळानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै बँकेच्या संचालकपदी वर्णी लागली होती, तिथूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते.
कौटुंबिक की राजकीय लढाई?
एकीकडे विनोद घोसाळकर आजही उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान म्हणून उभे आहेत, तर दुसरीकडे त्यांची सून तेजस्वी घोसाळकर आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आगामी निवडणुकीत दहिसर-बोरिवली पट्ट्यात या वादाचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.