भाडेकरूला त्रास देऊ नका, सांगणे बेतले जीवावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 06:20 IST2021-06-29T06:20:06+5:302021-06-29T06:20:34+5:30

दोघांना अटक; स्थानिक टवाळखोराकडून घरमालकाची हत्या

Don't bother the tenant, houseowner killed by local | भाडेकरूला त्रास देऊ नका, सांगणे बेतले जीवावर

भाडेकरूला त्रास देऊ नका, सांगणे बेतले जीवावर

ठळक मुद्देमुलुंड पश्चिमेकडील एस.एन. रोड परिसरात राकेश वर्मा कुटुबासह राहतात. त्यांचे अलीबहादूर चाळीत असलेले दुकान रेहमान शेख यांना भाड्याने दिले आहे. शेख यांचा बिर्याणी विक्रीचा व्यवसाय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाडेकरूला त्रास देवू नका, सांगणे मालकाच्या जीवावर बेतल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. राकेश वर्मा असे मृत मालकाचे नाव असून, स्थानिक टवाळखोरांनी चाकू भोसकून त्यांची हत्या केली. याप्रकरणी सनी देठेसह दोघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

मुलुंड पश्चिमेकडील एस.एन. रोड परिसरात राकेश वर्मा कुटुबासह राहतात. त्यांचे अलीबहादूर चाळीत असलेले दुकान रेहमान शेख यांना भाड्याने दिले आहे. शेख यांचा बिर्याणी विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून याच परिसरात राहणारा सनी देठे आणि त्याचे मित्र बिर्याणी खावून पैसे देत नव्हते. वर्मा यांना रेहमानने याबाबत सांगितले. त्यानुसार वर्मांनी सनीला त्याला त्रास देवू नये यासाठी विनंती केली. त्यानंतर रविवारी दुपारी रेहमान घरी आला व त्याने सनी आता त्रास देत नसल्याबाबत सांगितले. मात्र, दुपारी सव्वा तीनच्या सुमारास सनी घरी धडकला. त्याने, वर्मा यांना घराबाहेर बोलावले. ते बाहेर येताच जवळील मैदानात नेत मारहाण सुरू केली. त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी धाव घेतली. सनीने त्यांनाही मारण्याची धमकी दिली आणि वर्मा यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांची हत्या केली. नागरिकांची गर्दी जमा हाेताच सनी आणि त्याच्या साथीदारांंनी पळ काढला. पत्नी खुशबू (३६) हिच्या तक्रारीवरून वरील घटनाक्रम समोर आला. त्यानुसार पोलिसांनी सनी देठे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Don't bother the tenant, houseowner killed by local