नको छडीची छम छम, कायदा देईल दम! प्रतिबंधात्मक कायद्याबाबत शिक्षक अजूनही अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:49 IST2025-01-24T12:48:40+5:302025-01-24T12:49:32+5:30
Education News: ‘छडी लागे छम छम आणि विद्या येई घमघम’ हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलं असेल. मात्र, काळ बदलला तसा मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांनीही तितकीच कठोर भूमिका घेतली.

नको छडीची छम छम, कायदा देईल दम! प्रतिबंधात्मक कायद्याबाबत शिक्षक अजूनही अनभिज्ञ
मुंबई - ‘छडी लागे छम छम आणि विद्या येई घमघम’ हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलं असेल. मात्र, काळ बदलला तसा मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांनीही तितकीच कठोर भूमिका घेतली.
त्यामुळे शाळा असो वा शिकवणी वर्ग, विद्यार्थ्यांना अभ्यासानिमित्ताने किंवा अन्य कोणत्याही कारणाने मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर आता कायदेशीर कारवाई केली जात आहे.
गृहपाठ नाही केला!
गृहपाठ न केल्याने खासगी शिकवणीतील शिक्षकाने दुसरीत शिकणाऱ्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला काठीने बेदम मारहाण केली.
विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ येतानाच हातातून रक्त आल्याने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर पालकांच्या तक्रारीवरून शैलेश शेट्टी या शिक्षकावर साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रश्नांची उत्तरे नाही आली...
खासगी शिकवणी शिक्षक अभिषेक त्रिवेदी (२८) याने प्रश्नांची उत्तरे येत नसल्याने एका १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या हातावर तसेच मानेवर मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला होता. याप्रकरणी गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
हात केला फ्रॅक्चर...
सांताक्रूझ परिसरात १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेच्या शिक्षिकेने केलेल्या मारहाणीत तिचा हात फ्रॅक्चर झाला.
तिला भाभा रुग्णालयात दाखल केल्यावर ही बाब उघडकीस आली आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ द्वारे शारीरिक शिक्षा प्रतिबंधित आहे. या कायद्याच्या कलम १७ नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा दिली जाऊ नये किंवा त्याचा मानसिक छळही केला जाऊ नये. सर्वोच्च न्यायालयानेही सर्व प्रकारच्या शारीरिक शिक्षेवर बंदी घातली आहे. ज्यात काठीने मारणे, चपराक मारणे आणि मारहाण करणे याचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला शिस्तीसाठी इतर प्रतिबंधात्मक उपायांचा वापर करणे आवश्यक आहे.
- ॲड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना, कायदेतज्ज्ञ
हाता-पायावर वळ...
खार पोलिसांच्या हद्दीत शाळा तसेच घरी खासगी शिकवणी घेणाऱ्या जेन डिसूजा या शिक्षिकेने ८ वर्षांच्या विद्यार्थिनीला मारहाण केली.
ज्यात तिच्या हाता-पायावर वळ आल्याने तिच्या आईने पोलिसात धाव घेतली.