भुंकतो म्हणून श्वानाला घातली गोळी, अंधेरीतील घटना; सात मित्रांमुळे वाचले प्राण

By गौरी टेंबकर | Updated: December 31, 2024 10:31 IST2024-12-31T10:31:09+5:302024-12-31T10:31:27+5:30

अंधेरी पश्चिमेकडील शांतिवन कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या आवारात वावरणाऱ्या वुल्फी या भटक्या श्वानाच्या बाबतीत हा प्रकार घडला...

Dog shot for barking, incident in Andheri; Seven friends save lives | भुंकतो म्हणून श्वानाला घातली गोळी, अंधेरीतील घटना; सात मित्रांमुळे वाचले प्राण

भुंकतो म्हणून श्वानाला घातली गोळी, अंधेरीतील घटना; सात मित्रांमुळे वाचले प्राण

गौरी टेंबकर - कलगुटकर -

मुंबई : रात्री-अपरात्री भुंकतो म्हणून कातावलेल्या रहिवाशाने थेट भटक्या श्वानावर गोळी झाडली. त्यात जबर जखमी झालेल्या या श्वानाला परिसरातील सात तरुणांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याची मरणाशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

अंधेरी पश्चिमेकडील शांतिवन कॉम्प्लेक्स या सोसायटीच्या आवारात वावरणाऱ्या वुल्फी या भटक्या श्वानाच्या बाबतीत हा प्रकार घडला. रविवारी मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास वुल्फीवर कोणीतरी गोळी झाडल्याचा आवाज झाला. गोळी लागल्याने जखमी झालेला वुल्फी विव्हळायला लागला. त्याच्या आवाजाने जागे झालेल्या कायनाथ गायकवाड, सुमित सिंग, आदित्य सामंत, आयुष सिंग, सिद्धी सुर्वे, लोकेश सावंत आणि शान सावंत या सोसायटी परिसरात राहणाऱ्या सात जणांनी तातडीने वुल्फीला प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना २० हजार रुपये उपचार खर्च सांगण्यात आला. 

विद्यार्थिदशेत असलेल्या या सातही प्राणीप्रेमी मित्रांनी धावपळ करत कसेबसे १५ हजार रुपये जमवले. त्यानंतर वुल्फीवर उपचार करण्यात आले. अजूनही वुल्फीवरील धोका टळलेला नाही, असे कायनाथ गायकवाड यांनी सांगितले.  

पिता-पुत्राची चौकशी सुरू  
सोसायटीत राहणाऱ्या प्रशांत लक्ष्मेश्वर (५२) आणि त्यांचा मुलगा आदित्य (२६) यांना ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन एअरगनही हस्तगत केल्या आहेत. मात्र, या दोघांनी वुल्फीवर एअरगनने गोळी झाडल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. पोलिस एअरगनची तपासणी करत असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वुल्फी सोसायटीतील कोणावरही भुंकत नाही, त्याचे वर्तन खेळकर असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Dog shot for barking, incident in Andheri; Seven friends save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.