सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 05:03 AM2017-11-10T05:03:46+5:302017-11-10T05:03:58+5:30

गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

Doctor's suicide in Siddharth Hospital | सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

सिद्धार्थ रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या

googlenewsNext

मुंबई : गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात एका महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्रेमभंगातून तिने हे पाऊल उचलल्याचे समजते. सय्यद मेहजबीन नसरीन (२४) असे या डॉक्टरचे नाव आहे.
दोन महिन्यांपूर्वीच सिद्धार्थ रुग्णालयात गायनोकॉलोजिस्ट म्हणून इंटर्नशिपसाठी त्या भरती झाल्या होत्या. रुग्णालयातील हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावरील रूम नंबर १४मध्ये त्या एकट्याच राहत होत्या. बुधवारी त्यांची सुट्टी होती. गुरुवारी सकाळी ९च्या सुमारास त्यांनी ड्युटीवर हजर राहणे अपेक्षित होते. मात्र त्या आल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे काही सहकारी त्यांना बोलावण्यासाठी त्यांच्या रूमवर गेले, रूमचा दरवाजा बराच वेळ ठोठावला. नसरीनला आवाजही दिला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांनी याबाबत वरिष्ठांना सांगितले. तेव्हा नसरीनच्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला; आणि समोर फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत नसरीन त्यांना दिसल्या. नसरीनला उपचारार्थ सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांना कळविण्यात आले असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत नसरीनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
आम्ही नसरीनचा मोबाइल आणि लॅपटॉप हस्तगत केला आहे. तसेच तिचे सहकारी, मित्र आणि वरिष्ठांचा जबाब नोंदवत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे यांनी सांगितले. तिने टोकाचे पाऊल का उचलले? याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. नसरीनचे रुग्णालयात कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे त्या तणावाखाली होत्या. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हॉस्टेल अथवा रुग्णालयात त्यांना कोणी मानसिक त्रास देत होते का? याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.

Web Title: Doctor's suicide in Siddharth Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर