'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:26 IST2025-12-03T09:25:20+5:302025-12-03T09:26:45+5:30
संजना या ताडदेव वाहतूक पोलिस विभागात गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. त्या २००६ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून सशस्त्र पोलिस दल, वायरलेस तसेच वाहतूक विभागात सेवा बजावली.

'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
मुंबई : रस्त्यावर वाहनांचा कर्णकर्कश आवाज, कुठे प्रवासी भाडे नाकारणाऱ्यावरून होणारा वाद तर कुठे पुढे जाण्यासाठी भरधाव वाहनांची लगबग त्यात प्रदूषणाची भर अशा परिस्थितीतही केम्स कॉर्नर, महालक्ष्मी परिसरात महिला पोलिस हवालदार संजना राजेश डक्का नेहमीच हसतमुखाने, संयमाने परिस्थिती हाताळताना दिसतात. एरवी पोलिसांना पाहून नाक मुरडणारेही त्यांचे कौतुक करताना दिसतात. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेची वरिष्ठांकडूनदेखील दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
संजना या ताडदेव वाहतूक पोलिस विभागात गेल्या तीन महिन्यांपासून कार्यरत आहे. त्या २००६ मध्ये पोलिस दलात रुजू झाल्या. तेव्हापासून सशस्त्र पोलिस दल, वायरलेस तसेच वाहतूक विभागात सेवा बजावली.
२०२३ पासून त्या वाहतूक विभागात कार्यरत आहे. त्यांच्या हटके स्टाइलमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांनी एका विनाहेल्मेट चालकास अडवले, त्या वेळी त्यांनी सांगितले की, आत्ताच पाठीमागे दंड भरलेला आहे. त्यावर संजना यांनी दिलेल्या उत्तराने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली.
त्यांनी दिलेल्या उत्तरात ‘तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवण केले व त्याचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर दाखवले तर ते चालेल का? त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल सांगत दंड भरण्यास सांगितले.
संजना सांगतात, मी फक्त माझे कर्तव्य करते. कुठलाही ताण न घेता आपले कर्तव्य आनंदाने बजावल्यास काम सुरळीत होते. वाहतूक पोलिस सतत रस्त्यावर काम करतो. कारण चिडचिड केली तर नुकसान मलाच होणार आहे. त्यापेक्षा कामात आनंद शोधत संयमाने परिस्थिती हाताळण्यावर भर देते. केम्स कॉर्नर, महालक्ष्मी या भागात अनेकदा टॅक्सीचालक ज्येष्ठ नागरिकाचे भाडे नाकारतात. जवळचे भाडे त्यांना नको असते. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकाचा हात धरून टॅक्सीत बसवताच त्यांच्याकडून मिळणारा आशीर्वाद काम करण्यास आणखीन बळ देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या कामाची दखल घेत वरिष्ठांकडून त्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
ताडदेव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजना या कामामध्ये तरबेज आहेत. कोणत्याही कर्तव्याला नकार देत नाहीत व सतत उत्साहीपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांचे कार्य कौतुकास्पद
केम्स कॉर्नर परिसरात माझ्या चालकानेही चूक केली होती. तेव्हा महिला पोलिस संजना डक्का यांनी माझे वाहन अडवले. त्यानंतर चालकाला प्रेमाने समजावून चूक लक्षात आणून दिली. त्या अतिशय संयमाने, सभ्यतेने संवाद साधत होत्या. माझ्यासाठी तो सुखद धक्का होता. त्यांच्या कामाचे कौतुक केले व मी पुढे गेलो. पुन्हा काही वेळाने त्याच मार्गाने परत येत असताना त्या महिला पोलिस अन्य चालकांना त्याच पद्धतीने समजावताना दिसल्या. मी त्यांचे हात हलवत कौतुक केले. -डॉ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)