Rahul Gandhi Swatantrya Veer Savarkar News: मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या याचिकाकर्त्याने केलेली मागणी फेटाळून लावण्यात आली. पण, युक्तिवादादरम्यान याचिकाकर्त्याकडून केलेल्या गेलेल्या एका विधानावरून कोर्टाने फटकारले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंकज कुमुदचंद्रा फडणीस यांनी राहुल गांधीविरोधात ही याचिका दाखल केली होती. पंकज फडणवीस हे अभिनव भारत काँग्रेस या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. राहुल गांधी यांच्याकडून वीर सावरकरांबद्दल केलेल्या जाणाऱ्या बालिश आणि बेजबाबदार विधानांमुळे गोंधळ होतो, असा मुद्दा त्यांनी याचिकेत नमूद केला होता.
राहुल गांधींना सावरकरांबद्दल अभ्यास करायला सांगा
पंकज फडणीस यांनी याचिकेत अशी मागणी केली होती की, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वाचाव आणि स्वतःचे ज्ञान वाढवावे, असे निर्देश न्यायालयाने त्यांना द्यावेत.
न्यायमूर्ती अलोक अराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालय म्हणाले, "तुम्ही तुमच्या याचिकेत विनंती केली आहे की, आम्ही त्यांना निर्देश द्यावेत की, त्यांनी व्यक्तिशः अभ्यास करावा आणि तुमची याचिका वाचावी. तुमची याचिका वाचावी, अशी सक्ती न्यायालये कशी करू शकते?", असा उलट सवाल न्यायालयाने याचिकाकर्त्याला केला.
याचिकाकर्ता न्यायालयात म्हणाला की, "ते विरोधी पक्षनेते आहेत आणि ते गोंधळ तयार करत आहेत. जर ते पंतप्रधान झाले, तर ते कहरच करतील."
ते पंतप्रधान होणार तुम्हाला माहिती आहे का?
याचिकाकर्त्याच्या पंतप्रधान होण्याबद्दलच्या युक्तिवादावर न्यायालय म्हणाले, "आम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का की ते पंतप्रधान होणार आहेत?"
न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले की, वीर सावरकरांचे पणतू आधीच पुण्यातील न्यायालयात गेले आहेत. त्यांनी बदनामीची याचिका दाखल केली आहे. याच मुद्द्यावर तिथे अगोदरपासून सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावली, असे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.