Join us  

पाऊस दाटलेला... ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या अलर्टचा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 4:37 PM

नैसर्गिक आपत्तीच्यावेळी हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.

मुंबई: मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतुकीचा वेगदेखील मंदावला आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. तसेच पावसाचा फटका हा रेल्वे वाहतुकीला देखील बसल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सकाळी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात होता. मात्र पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे हवामान खात्याकडून आता मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

नैसर्गिक आपत्तीच्यावेळी हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. यामध्ये आपत्तीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज किंवा रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिला जातो. मात्र प्रत्येक अलर्टमागे नेमका काय अर्थ असतो, हे नागरिकांनी समजून घेणं आवश्यक आहे.

ग्रीन अलर्ट: ग्रीन अलर्ट हा परिस्थिती सामान्य असल्यास देण्यात येतो.

येलो अलर्ट:  आगामी काही दिवसांमध्ये हवामानातील बदलामुळे  नैसर्गिक संकट येऊ शकतं तसेच दैनंदिन कामात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट: कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते यामुळे येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे यासाठी  ऑरेंज अलर्ट देण्यात येतो.  त्याचप्रमाणे नागरिकांनी  महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अशी सुचना या अलर्टमध्ये दिली जाते. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता ऑरेंज अलर्टमध्ये व्यक्त केलेली असते.

रेड अलर्ट: रेड अलर्टच्या वेळी मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच नागरिकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा या अलर्टचा अर्थ असतो. 

मुंबईत तुफान पाऊस कोसळला असून, येथे 131 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवस मान्सून राज्यभर सक्रिय राहील. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर मान्सूनचा जोर राहील. मराठवाड्यातही सरी कोसळतील. गुरुवारनंतर मात्र मान्सूनचा जोर कमी होईल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरावर व त्या लगतच्या ओडिशाच्या किनारपट्टीवर सलग सातवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. 

टॅग्स :मुंबई मान्सून अपडेटहवामानमुंबईपाऊस