काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:15 IST2025-08-20T13:15:04+5:302025-08-20T13:15:04+5:30

मुसळधार पावसातही  मुंबई पोलिस ‘ऑन ड्युटी’; नागरिकांना मोठा दिलासा

Do not worry we are always ready to help Police reassured 93-year-old mumbai old man | काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर

काळजी करू नका, मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर; ९३ वर्षांच्या आजोबांना पोलिसांनी दिला धीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शासकीय, निम शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केली. तर, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याच्या सूचना देण्यात आहेत. या परिस्थितीत पोलिस ‘ऑन ड्युटी’ त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनीही नागरिकांना केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, असे आवाहन करत, मदतीसाठी आम्ही आहोत, असा दिलासाही दिला आहे.

सकाळपासून रौद्र रूप घेतलेल्या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचले. अनेक ठिकाणी पादचारी, उपनगरीय लोकल गाड्या आणि रस्त्यावरून धावणारी वाहने काही ठिकाणी अडकून पडली. सुट्टी जाहीर केल्यामुळे सोमवारपेक्षा रस्त्यावर वाहनांची कमी वर्दळ  होती. मात्र, सकाळीच घराबाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ झाला. कर्तव्यावर असलेले पोलिस अधिकारी आणि अंमलदार माणुसकीच्या नात्याने अडकून पडलेल्या प्रत्येकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशीही धडपड करताना दिसून आले.

९३ वर्षीय आजोबा सुखरूप रुग्णालयात

कुर्ला परिसरात ९३ वर्षीय आजोबा पावसात अडकून पडले होते. ही माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आजोबांना सुरक्षितपणे जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घेतलेल्या काळजीने भारावलेल्या आजोबांनी आभार मानले.

पोलिस आयुक्त काय म्हणाले?

पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत,  सुप्रभात मुंबई ! आज मुसळधार पावसाचा इशारा असल्याने आपण सर्वजण सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा आहे. केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम्ही आहोत. खासगी कंपन्यांनीही शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. काळजी घ्या, सुरक्षित राहा.

नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

पावसाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. तसेच योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी कुठलीही मदत लागल्यास तत्काळ नियंत्रण कक्षात संपर्क  करा, असे देवेन भारती यांनी  सांगितले आहे. मुंबईकरांसाठी संकटाच्या काळात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या पोलिस दलाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

 

Web Title: Do not worry we are always ready to help Police reassured 93-year-old mumbai old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.