Join us

CoronaVirus News: दिवाळी, त्यानंतरचे  15 दिवस महत्त्वाचे; मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 06:57 IST

पुन्हा एकदा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’

मुंबई :  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ माेहीम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पुन्हा एकदा राबविण्याचे विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरात घ्यायच्या दक्षतेबाबत उद्धव यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी गर्दी नियंत्रण आवश्यक असून दिवाळी आणि त्यानंतरचे १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांचा लोकांशी कायमच संपर्क येतो असे विक्रेते, बस चालक, वाहक यांची सातत्याने चाचणी करण्याची सूचना त्यांनी केली. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या घटत असली तरी पाश्चिमात्य देशांत आलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही महिने यंत्रणांसोबतच नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रदूषण कमी झाले नाही, तर कोरोनाचे संकट कायम राहील ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे आवाहन त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना केले. सांसर्गिक आजारांवरील उपचाराचे ५ हजार खाटांचे रुग्णालय करण्याचा निर्धार त्यांनी केला.

मोफत चाचण्यांसाठी २४४ केंद्रे

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा मुंबईत कशाप्रकारे सकारात्मक परिणाम झाला, याबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्था अभ्यास करणार आहे. कोरोनाच्या मोफत चाचण्यांसाठी २४४ केंद्रे सुरू असून दररोज २० हजार चाचण्यांचे उद्दिष्ट आहे.- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

पुढील वर्ष पूरमुक्त : पुढील वर्ष पूरमुक्त ठेवायचे नियोजन आताच करावे, त्यासाठी नाले रुंदीकरण, खोलीकरण ही कामे हाती घ्यावीत. त्याचबरोबर रस्ते तसेच अन्य विकासकामांवर लक्ष केंद्रित करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस