सी लिंक प्रकल्पाबाबत नाराजी; पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:35 IST2025-11-04T12:34:38+5:302025-11-04T12:35:30+5:30
महामुंबईतील कामांना गती, बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय

सी लिंक प्रकल्पाबाबत नाराजी; पायाभूत सुविधा वॉर रूम बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कामांचा आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सोमवारी मुंबई उपनगर, ठाणे व पुणे येथे सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस वरिष्ठ अधिकारी व संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार उपस्थित होते. मेट्रोच्या कामांना गती देण्याबाबतचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबाबतही त्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
नायगावच्या बीडीडी चाळ प्रकल्प जून २०२९ पर्यंत पूर्ण तर वरळीचा प्रकल्प मे २०२९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प जून २०३१ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
मुंबई मेट्रो लाईन - २ बी ही डी. एन. नगर ते डायमंड गार्डन-मंडाले अशी धावणार असून हा प्रकल्प ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाइन ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी. यासाठी नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीबाबतच्या अडचणी १५ दिवसांत सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा प्रकल्प अहोरात्र कष्ट करून पूर्ण करावा. मागे पडलेले प्रकल्प वेळेत होण्यासाठी संबंधित अधिकारी व कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
महामुंबईतील कामांना गती, बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय
- ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्प, उत्तन विरार सी लिंक प्रकल्प, ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह शहरी बोगदा प्रकल्प योग्य नियोजन करून वेळेत पूर्ण करा.
 - ऐरोली-काटई नाका फ्री-वे प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २० मिनिटांवर येणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहणासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तत्काळ रक्कम द्यावी.
 - वडपे-ठाणे या २३.८ कि.मी. रस्त्यापैकी १९ किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण आहे.
 - मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.