Join us

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिंदे सेनेतून मुंबईला वाटण्याच्या अक्षदा, इच्छुकांमध्ये नाराजी

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 17, 2025 14:11 IST

नंदुरबार येथील माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांना तिकीट जाहिर झाल्याने मुंबईतील शिंदे सेनेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबई - राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी येत्या दि,२७ मार्चला निवडणुक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिंदे सेनेतून अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नंदुरबार येथील माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांना तिकीट जाहिर झाल्याने मुंबईतील शिंदे सेनेच्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुंबईतून शिंदे सेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे या या जागेसाठी प्रमुख दावेदार होत्या.तर माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत,ठाण्यातून संजय मोरे आणि रवींद्र फाटक आदी इच्छुकांची  नावे देखिल चर्चेत असतांना माजी आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांना शिंदे सेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. सूर्यवंशी यांना कमिटमेंट दिल्याप्रमाणे त्यांना तिकीट दिले,मग आमचे काय? असा सवाल शिंदे सेनेतील मुंबईतील इच्छुक उघडपणे करू लागले आहेत. 

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आक्रमक चेहरा म्हणून शीतल म्हात्रे यांचा शिंदे सेनेच्या एका जागेसाठी विचार व्हावा अशी मागणी शिंदे सेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांनी पक्षातील वरिष्ठांची  भेट घेतली होती. त्यांनी पक्षासाठी वाईटपणा घेतला.त्यांच्यावर अनेक आरोप झाले, त्यांना सतत ट्रोल केले जाते,तर मातोश्री त्यांना नेहमी टार्गेट करते. त्यांनी आमदार व उद्धव सेनेतून अनेक माजी नगरसेवक पक्षात आणले. एकीकडे उद्धव सेनेचे आमदार अँड.अनिल परब विधानपरिषदेत महायुतीला अंगावर घेत असतांना त्यांना सडेतोड उत्तर देणाऱ्या शीतल म्हात्रे यांना शिंदे सेनेतून तिकीट मिळाले पाहिजे होते असे मत पश्चिम उपनगरातील शिंदे सेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी व्यक्त केले.

माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांना विधानरिषदेच्या पदवीधर निवडणूकीत शिंदे सेनेची जागा असतांना ती जागा भाजपाला सोडण्यात आली. विलेपार्ले किंवा अंघेरी पूर्व या विधानसभेतून तिकीट मिळावे अशी  मागणी त्यांनी केली होती, पण त्याही वेळी त्याना डावलले त्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली. मला कुपोषण निर्मूलन टास्क फोर्स समितीच्या अध्यक्षपदी इंटरेस्ट नसून या एका जागेसाठी माझा विचार करावा असे आपण दोनदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना सांगितले होते अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली.उपमुख्यमंत्री भविष्यात निश्चित विचार करतील असा मला विश्वास आहे.

याबद्धल शीतल म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,जो काम करेंगा वही राजा बनेगा,राजाका बेटा राजा नही बनेगा असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात.मला तिकीट मिळाले नाही याचे वाईट वाटले.पण मी पक्षाची काम करणारी कडवट शिवसैनिक आहे. उपमुख्यमंत्री भविष्यात निश्चित संधी देतील असा मला विश्वास वाटतो.

टॅग्स :विधान परिषदएकनाथ शिंदेराजकारणमहाराष्ट्र