आदित्य ठाकरे नव्या कचाट्यात?; दिशा सालियन प्रकरणातील वकिलांचे गंभीर आरोप, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:36 IST2025-03-25T15:33:13+5:302025-03-25T15:36:09+5:30
Disha Salian Case: आदित्य ठाकरेंचे नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले? किती कोटींची डील झाली? असा सवाल वकिलांनी केला.

आदित्य ठाकरे नव्या कचाट्यात?; दिशा सालियन प्रकरणातील वकिलांचे गंभीर आरोप, म्हणाले...
Disha Salian Case: आम्ही याआधीही म्हटले होते की जेव्हा एखाद्या प्रकरणात एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असतो, तेव्हा अशा प्रकारे तक्रार द्यावी लागते. आम्ही मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे तक्रार दिली आहे. आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावे लागेल, असे दिशा सालियन प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी म्हटले आहे.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी लेखी तक्रार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिशा सालियन प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी मोठा दावा केला आहे. तसेच आम्ही जी तक्रार दिली तीच एफआयआर आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनू मोर्या, सूरज पंचोली, तसेच त्यांचे सुरक्षा रक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रावर्ती हे सर्व लोक आमच्या तक्रारीनुसार आरोपी आहेत, असे निलेश ओझा यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचे नाव आले, तेव्हा...
या प्रकरणात जेव्हा आदित्य ठाकरे यांचे नाव आले, तेव्हा परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशी स्टोरी सांगितली की आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. यामध्ये कोणताही राजकीय नेता त्या ठिकाणी आलेला नव्हता असे परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद सांगितले होते. तसेच नार्कोटेक्स ब्युरोच्या तपासात हे आढळून आले आहे की, आदित्य ठाकरे हे ड्रग्स बिझनेसमध्ये सहभागी आहेत. त्यासंदर्भातील सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. आदित्य ठाकरे, दिनो मोर्या यांच्या फोन कॉल्ससह समीर खान नावाच्या व्यक्तीची डीएफीपी नावाची कंपनी होती, जी ड्रग्सचे सिंडिकेट चालवत होती, असा मोठा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचे नाव ड्रग्सच्या बिझनेसमध्ये आल्यानंतर समीर वानखेडे असो किंवा नार्कोटेक्स ब्युरोचे इतर अधिकारी असतील, त्यांना आदित्य ठाकरेंवर कारवाई करण्यासाठी कोणी थांबवले. किती कोटींची डील झाली, अशी विचारणा निलेश ओझा यांनी केली. तसेच ११ डिसेंबर २०२३ रोजी सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये, त्यांनी या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय आमच्याकडे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, असा दावाही ओझा यांनी केला.