Discussions that some bjp leaders were in touch with both Congress | भाजपमध्ये कुरबुरी; काही नेते दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा
भाजपमध्ये कुरबुरी; काही नेते दोन्ही काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा

मुंबई : भाजपचे काही नेते नाराज असल्याची कुजबुज असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसमधून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेले काही आमदार पुन्हा आता आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केल्यानंतर, आमच्या पक्षातील एकही आमदार भाजप सोडून जाणार नाही, असा दावा माजी मंत्री आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केला.
निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने भाजपचे काही नेते अस्वस्थ असल्याची चर्चा बराच काळपासून सुरू आहे. तसेच चुकीच्या वेळी आपण भाजपमध्ये गेलो, अशी खंत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून तिथे गेलेले काही नेते बोलून दाखवत आहेत. मात्र त्यांनी भाजप सोडून परत माघारी जाण्याबाबत चर्चा केल्याचे दिसत नाही.
विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेत गेलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दावा केला की, एकेकाळी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना भाजपमधून बाहेर काढण्याचा आदेश आला होता. पण त्यावेळी भाजपमधील माझ्यासारख्या अनेकांनी विरोध केल्याने भाजपच्या श्रेष्ठींनी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तर आतापासूनच सावध राहणे गरजेचे आहे.
भाजपचे नेते आशीष शेलार यांनी मात्र आमचे आमदार फुटणार या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत, असे सांगत, अशा बातम्यांची खिल्लीच उडवली. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या अपक्ष आमदारांंना मंत्रिपदाची आश्वासने दिली. पण सहा जणांनाच आतापर्यंत मंत्री केले आहे आणि त्यांनाही त्यांची खाती अद्याप देण्यात आलेली नाहीत.
मिळालेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने ‘तिघाडी’च्या व अपक्ष आमदारांत अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. भाजपतील डझनभर आमदार फुटणार असे खोटे वृत्त आहे, असे ते म्हणाले.
अन्य पक्षातून आलेले असो वा मूळ भाजपचे असलेले आमदार सर्व पक्षशिस्त पाळणारे आहेत. त्यांचा नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललेय ? त्याचा एकदा कानोसा घ्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

बाळासाहेब थोरात : भरतीनंतर ओहोटीही येतेच
पंकजा मुंडे भाजपवर नाराज असल्याची चर्चा, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षनेतृत्वावर डागलेली तोफ, स्वत: खडसे आणि पक्षाचे नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांनी घेतलेली भेट या सर्व पार्श्वभूमीवर आता पक्षाचे एक राज्यसभा सदस्य व १२ आमदार काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, भरती व ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे. भरतीनंतर ओहोटीही येतेच.

Web Title: Discussions that some bjp leaders were in touch with both Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.