Raj Thackeray And CM Devendra Fadnavis Meet: बेस्ट पतपेढी निवडणूक निकालात ठाकरे बंधूंच्या युतीला चितपट करत शशांक राव आणि महायुतीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचा धुरळा शमतो ना शमतो तोच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली, कोणत्या प्रश्नांसाठी भेट घेतली, याबाबत सविस्तर माहिती दिली. परंतु, राजकीय वर्तुळात घडत असलेल्या घडामोडी, या दोन नेत्यांमध्ये तब्बल ५५ मिनिटे झालेली चर्चा ही केवळ मुंबईतील रस्ते, पार्किंगवरच होती का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाल्याचे म्हटले जात आहे.
'रस्ते बांधकामाचे टेंडर काढा, रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा, हा नवा धंदा सुरू झाला आहे,' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका केली. याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई शहर नियोजनाचा लघुआराखडा सादर करत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना चांगल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू, असा प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. परंतु, ही केवळ मुंबईकरांच्या विषयावर भेट मर्यादित होती का की आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काहीतरी नवीन शिजत आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दया कुछ तो ‘राज’ की बात है...
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी भेट घेतली. मुंबईकरांना चांगले रस्ते, पार्किंगला जागा हव्यात, अशा सूचना या भेटीदरम्यान केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मात्र, ही भेट आता राजकीय चर्चेला खाद्य पुरविणारी ठरलीय. या दोन नेत्यांमध्ये तब्बल ५५ मिनिटे दीर्घ चर्चा झाली. एवढा वेळ केवळ चांगले रस्ते आणि पार्किंग जागांच्या नियोजनासाठी खर्ची केला, यावर विश्वास तरी कसा ठेवणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला असल्यास कुणालाही नवल वाटणार नाही. तर, दुसरीकडे काहीजण या बैठकीचे वर्णन दया कुछ तो ‘राज’ है, असे करीत आहेत. पण, यामागील ‘राज’ या नेत्यांनच माहित हे नक्की!, असे समजते.
दरम्यान, बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकालावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, काय आहे ते? हा विषय मला माहितीच नाही. या निवडणुका स्थानिक आहेत. पतपेढी का काहीतरी आहे ना. पतपेढीची निवडणूक ना. ठीक आहे. या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवे असते, असे सांगत याबाबतीत अधिक व्यक्त होणे राज ठाकरे यांनी टाळल्याचे म्हटले जात आहे.