भुयारी मेट्रोवर दिव्यांगांना सवलत लागू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 08:56 IST2025-11-25T08:55:51+5:302025-11-25T08:56:08+5:30
Mumbai Metro News: भुयारी मेट्रोवर आता अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग प्रवाशांसाठीही तिकीट दरावर २५ टक्के सवलती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.

भुयारी मेट्रोवर दिव्यांगांना सवलत लागू
मुंबई - भुयारी मेट्रोवर आता अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग प्रवाशांसाठीही तिकीट दरावर २५ टक्के सवलती लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अँड्रॉइड वापरकर्त्या दिव्यांग बांधवांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) यापूर्वी आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर मेट्रो कनेक्ट ३ ॲप वापरणाऱ्या दिव्यांग प्रवाशांना तिकीट दरात सवलत दिली होती. मात्र बहुतांश सर्वसामान्य वापरकर्ते हे अँड्रॉइड प्रणालीवरील मोबाइल वापरतात. तांत्रिक कारणांमुळे अँड्रॉइड वापरकर्त्यांना ही सेवा देण्यात विलंब होत असल्याचे एमएमआरसीने म्हटले होते. या सवलतीच्या ट्रिप पासचा लाभ घेता येणार नसल्याने बहुतांश दिव्यांग नागरिक वंचित राहणार होते. त्यातून ही सवलत मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याने एमएमआरसीवर दिव्यांग कार्यकर्ते दीपक कैतके यांनी टीका केली होती. त्यानंतर आता एमएमआरसीने अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणाली वापरकर्त्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दिव्यांग बांधवांना प्रवास पूर्णपणे मोफत करावा, अशी मागणी केली आहे.