Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनसे, उद्धवसेनेतही नाराजीनाट्य; राजीनामा, बंडखोरीचे सत्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:55 IST

कुणी अपक्ष लढणार, तर कुणाचा पक्षाला रामराम...

मुंबई : उद्धवसेना-मनसेतील इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता असल्याने ठाकरे बंधूंनी उमेदवारी यादी जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले. मात्र, आपला वॉर्ड दुसऱ्या पक्षाला गेल्यामुळे व अन्य इच्छुकाला उमेदवारी दिल्याने दोन्ही पक्षांत नाराजी उफाळली आहे. यामुळे नाराजी आणि बंडखोरी शमविण्याचे आव्हान ठाकरे बंधूंपुढे उभे ठाकले आहे. 

मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. २०१७च्या निवडणुकीत प्रभाग १९२ मधून शिवसेनेच्या प्रीती पाटणकर यांनी त्यांचा पराभव केला होता. हा प्रभाग आता खुला झाल्याने मनसेचे यशवंत किल्लेदार, स्नेहल जाधव आणि उद्धवसेनेचे प्रकाश पाटणकर इच्छुक होते. जागावाटपात मनसेला हा प्रभाग आल्याने मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे स्नेहल जाधव नाराज झाल्या, तर पाटणकर शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

कलिना विधानसभा मतदार संघातील प्रभाग १६६ मनसेकडे आला आहे. उद्धवसेनेचे आ. संजय पोतनीस यांनी हा प्रभाग प्रतिष्ठेचा केला असून, शाखाप्रमुख राजन खैरनार यांच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. खैरनारांना मनसेत आणून त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू असल्याने येथील मनसैनिकांनी राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी नेत्यांना भेटून नाराजी व्यक्त केली.भांडुप प्रभाग क्र. ११४मधील मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर इच्छुक होत्या. मात्र, हा वॉर्ड उद्धवसेनेला दिल्याने नाराज झालेल्या माजगावकर यांची राज यांनी समजूत काढली, तरीही त्यांची नाराजी कायम आहे. बंडखोरी करून अपक्ष म्हणून त्या अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.

वरळीतही बंडखोरीची शक्यताउद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातही वरळी कोळीवाडा प्रभागात माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्याचे समजताच शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी नाराज होऊन राजीनामा दिला आहे. तर, वडाळा येथील १७८ प्रभाग मनसेला दिल्याने उद्धवसेनेच्या इच्छुक माधुरी मांजरेकर नाराज झाल्या आहेत.

भाजपलाही नाखुशीची लागण बोरीवली पूर्व प्रभाग क्र. १४च्या भाजपच्या माजी नगरसेविका आसावरी पाटील यांनी नाराजीतून सोमवारी  मातोश्रीवर उद्धवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. तर, शिंदेसेनेच्या दिंडोशीतील प्रभाग क्र. ३७ मधील पदाधिकारी सिद्धी शेलार यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Discontent brews in MNS, Uddhav Sena; Resignations, rebellion begin.

Web Summary : Uddhav and Raj Thackeray face rebellion as ticket distribution sparks discontent. Resignations and independent candidacies loom due to ward allocations, challenging party unity in key Mumbai constituencies. BJP also sees defections.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६शिवसेनामनसेराज ठाकरेउद्धव ठाकरे