Join us  

दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 6:38 PM

दिव्यांग वधूला व्हिलचेअरवर बसवून उचलून २ मजले न्यावे लागले होते

Devendra Fadnavis, disabled bride Marriage Registration: सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणे अपंगांसाठी अनुकूल असावीत असा संकेत असतो. पण विराली मोदी यांच्याबाबत मुंबईत काही दिवसांपूर्वी एक विचित्र घटना घडली. विराली मोदी या दिव्यांग असूनही त्यांना लग्नाच्या रजिस्ट्रेशनसाठी व्हिलचेअरवर बसलेल्या अवस्थेत उचलून दोन जिने वर न्यावे लागले. याबद्दलची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती तसेच, संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार, अखेर आज रजिस्ट्रेशन प्रकरणातील संबंधित अधिकारी अरूण घोडेकर या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

नक्की प्रकरण काय?

विराली मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केली, "मी अपंग आहे आणि माझे लग्न खार मुंबईतील रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झाले. ऑफिसमध्ये लिफ्ट नव्हते. ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होते. माझे लग्न होते आणि अधिकारी लोक स्वाक्षरीसाठी खाली येत नाहीत. त्यामुळे लग्न झाल्यानंतर स्वाक्षरीसाठी मला दोन मजल्यापर्यंत नेले गरजेचे होते. त्यामुळे मला दोन मजले वर व्हीलचेअर उचलून नेण्यात आले. कार्यालयातील पायऱ्या गंजलेल्या असून तिच्या अपंगत्वाची माहिती अधिकार्‍यांना देऊनही तिला कोणतीही मदत करण्यात आली नाही. लग्नासाठी कार्यालयात नेत असताना पायऱ्यांवरून खाली पडली असती तर काय झाले असते?", असा सवालही विराली यांनी केला.

अधिकाऱ्यावर कारवाई का झाली?

घटनेतील पुढील भाग म्हणजे, विराली यांना पायऱ्या चढून वर जाणे शक्य नव्हते, त्यामुळे रजिस्ट्रेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तळमजल्यावर यावे आणि कारवाई पूर्ण करावी अशी विनंती करण्यात आली होती. पण तळमजल्यावर येण्यास संबंधिक अधिकारी अरूण घोडेकर यांनी नकार दिला. विवाहित महिलेचे ठसे आणि फोटो संगणकावर लागेल अशी सबब त्यांनी पुढे केली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

टॅग्स :लग्नमुंबईकुलसचिवदेवेंद्र फडणवीसनिलंबन