Join us  

उपनगरांमध्ये युतीच्या जागावाटपावर ठरणार राजकारणाची दिशा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 3:21 AM

दोन्हीकडून ‘थांबा आणि वाट पाहा’ची भूमिका; गटातटात हरवलेली काँग्रेस आणि आक्रसलेल्या राष्ट्रवादीमुळे विरोधी आवाज निष्प्रभ

- गौरीशंकर घाळे मुंबई : भाजप-शिवसेनेतील शीर्षस्थ नेते युतीच्या आणाभाका घेत आहेत. आगामी सर्व निवडणुकांना युती म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा निर्धार स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तर, सगळे ठरले आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत आहेत. युतीतील एकीचा सारा कस लागणार आहे तो मुंबई उपनगर जिल्ह्यात. तब्बल २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणाऱ्या या जिल्ह्यातील जागावाटपाचे गणित युतीचे नेते कशाप्रकारे सोडवितात, यावर बरेच काही अवलंबून आहे.युतीच्या नेत्यांनी सगळे ठरवले असले तरी उपनगरातील विद्यमान आमदार आणि इच्छुकांच्या ते किती पचनी पडेल, उमेदवारीकडे डोळे लावून बसलेल्या दुसºया फळीतील नेत्यांच्या राजकीय आशाआकांक्षांचे काय होणार, वर्षानुवर्षे ज्येष्ठ नेत्यांनी बांधलेल्या मतदारसंघाचा तिढा सुटणार की गुंता वाढणार... असे बरेच प्रश्न येथील राजकीय वर्तुळात सध्या चर्चिले जात आहेत. केवळ युतीच नाही तर आघाडी आणि मनसेचेही बरेचसे राजकारण युतीच्या जागावाटपावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या तरी दोन्ही बाजूंचे शिलेदार ‘थांबा आणि वाट पाहा’ च्या भूमिकेत वावरत आहेत.मुंबई उपनगर जिल्ह्यात सायनपासून मुलुंड आणि माहीमपासून पार दहिसरपर्यंतचा परिसर येतो. २०१४ पर्यंत युतीच्या जागावाटपात शिवसेनाच थोेरल्या भावाच्या भूमिकेत असायचा. २६ पैकी तब्बल १६ जागा शिवसेनेकडे तर उर्वरित दहा जागा भाजपच्या वाट्याला यायच्या. २०१४ च्या निवडणुकांनी मात्र मुंबईतील राजकीय समीकरणे बदलून टाकली. धाकल्या भावाच्या भूमिकेतील भाजपने शिवसेनेला मागे टाकत अव्वल स्थान मिळविले. स्वतंत्रपणे १२ जागांवर भाजपचे कमळ फुलले. यातील अनेक जागा वर्षानुवर्षे शिवसेनेच्या होत्या, तर शिवसेनेला ११ जागा राखण्यात यश मिळाले. त्यामुळे आताच्या जागावाटपासाठी युतीला नवा फॉर्म्युला शोधावा लागेल. ज्याचा आमदार त्याचा मतदारसंघ, हा त्यातील एक फॉर्म्युला असू शकतो. तो ठरल्यास गोरेगावसारख्या मतदारसंघांचा तिढा सोडवावा लागेल. युतीच्या जुन्या जागावाटपात पूर्वापार शिवसेनेकडे राहिलेल्या दहिसर, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि विलेपार्ले या जागांवर २०१४ ला भाजप उमेदवार विजयी झाले. तर चेंबूर आणि कलिना या भाजपच्या कोट्यातील जागांवर शिवसेना विजयी झाली. यापैकी गोरेगाव हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मतदारसंघ आहे. येथून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी झाल्या. त्या सध्या राज्यमंत्री आहेत. त्यामुळे गोरेगावची जागा भाजपकडे की शिवसेनेकडे, असा प्रश्न आहे. गोरेगावच्या बदल्यात शिवसेनेने जिंकलेली एक जागा सोडावी, असा प्रस्ताव असू शकतो. मागाठाणेच्या बदल्यात गोरेगाव, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, पालिका निवडणुकीत शिवसेनेने या मतदारसंघात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ही जागा सोडण्यास शिवसेना अनुकूल नाही.मनसेचे इंजीन सिग्नलच्या प्रतीक्षेतजोपर्यंत राज ठाकरे काही जाहीर करत नाहीत तोवर वाट पाहणे किंवा कृष्णकुंजवर ये-जा असणाºया निवडकांकडून अंदाज घेत राहण्याचेच काम मनसेतील भल्याभल्यांच्या वाट्याला आल्याचे सध्याचे वास्तव आहे.सध्याचे पक्षीय बलाबलएकूण जागा २६भाजप - १२शिवसेना - ११काँग्रेस - २सपा - १

टॅग्स :शिवसेनाभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस