Join us
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 18:55 IST

मे व जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोशीत कोरोनाचा विळखा आता सैल होत असल्याचे चित्र आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गेल्या मे व जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोशी विधानसभा मतदार संघात कोरोनाचा विळखा आता सैल होत असल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात स्लम तसेच उंच व गगनचुंबी इमारती येथे आहेत.

पालिकेच्या पी वॉर्ड मध्ये मोडत असलेल्या दिंडोशी मतदार संघाची लोकसंख्या सुमारे 3 लाखांच्या आसपास आहे.याठिकाणी कोरोनाचा हॉट स्पॉट झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन करून येथील परिस्थितीची माहिती घेतली. येथील कोरोना नियंत्रणात आणा अश्या सूचना त्यांनी पालिका प्रशासन व पोलिसांना दिल्या. पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिंडोशीला भेट दिली. पोलिसांनी हॉटस्पॉट असलेल्या भागात कडक लॉकडाऊन केला.तर पालिका उपायुक्त रणजित ढाकणे व पी ऊत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे ,वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि या वॉर्डचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे दिंडोशीत कोरोनाचा विळखा सैल झाला. गेल्या शुक्रवारी येथे कोरोनाचे 24 रुग्ण व काल शनिवारी 34 रुग्ण आढळून आले अशी माहिती शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,स्थानिक आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमतला दिली.

गेल्या सात दिवसांपासून येथील संतोष नगर,कुरार, कोकणी पाडा, तानाजी नगर,आप्पा पाडा, पठाणवाडी,शिवाजी नगर या भागात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी येथील दि,10 जून पासून असलेला लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केला.येथील दुकाने आता सोमवार,बुधवार व शुक्रवारी तर इतर भागातील दुकाने ही मंगळवार,गुरुवार व शनिवारी सुरू राहणार असल्याचे परिपत्रक काल जारी केले अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.

येथील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची चेस द व्हायरस व झिरो मिशन ही मोहिम दिंडोशीत प्रभावीपणे राबवण्यात आली.येथील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. वस्ती वस्ती व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन वैद्यकीय शिबीरे घेण्यात आली, स्क्रिनिग तसेच संशयित  रुग्णांची अँटीजन टेस्ट केली.विशेष म्हणजे येथील खासदार, आमदार,सर्व नगरसेवक आणि एनजीओ यांचे चांगले सहकार्य पालिका प्रशासनाला मिळाले. तसेच पोलिस यंत्रणेने पालिकेला चांगले सहकार्य करून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केली.त्यामुळे दिंडोशीत कोरोनाचा विळखा  सैल होत असल्याची माहिती संजोग कबरे यांनी दिली.जरी येथील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील केला असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे तसेच सोशल डिस्टनसिंग पाळणे,मास्क कायम लावणे याकडे जातीने लक्ष देऊन पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉक