Dindoshi: Complete the development work on time | दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा

दिंडोशी : विकासकामे नियोजित वेळेत पूर्ण करा

मुंबई : दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामांबाबत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. स्थानिक आमदार  सुनिल प्रभू यांच्या पुढाकाराने नुकतेच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील रखडलेली विविध विकासकामे नियोजित वेळेत मार्गी लावण्यात यावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. 

एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांच्या माध्यमातून आणि समन्वयातून मालाड पूर्व दिंडोशी विभानसभा क्षेत्रात विविध विकासकामे सुरु आहेत. याअनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार सुनिल प्रभू, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्यासह संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मालाड (पूर्व) कुरार गाव, हुमेरा पार्क येथील राणी सती मार्ग, मल्लिका हॉटेल ते दिंडोशी बस डेपो यांना जोडणारा रस्ता आणि या रस्त्याच्या पुढील टप्प्यात असणाऱ्या पात्र घरांचे स्थलांतर करुन प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करणे, मालाड पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्गाखालून मालाड रेल्वेस्थानक ते आप्पा पाडा यांना सलग जोडणाऱ्या पुष्पा पार्क पादचारी भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम जलदगतीने पूर्ण करणे, गोरेगाव पूर्व येथील गोरेगाव – मुलुंड लिंक रोड विकासकामासाठी मुंबई महापालिकेने निधी मंजूर केला असून सदरहू उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु करणे, कांदिवली लोखवाला ते रत्नागिरी हॉटेल येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करणे, यासाठी विन विभागाची नाहरकत मिळवणे, या रस्त्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भागात भुयारी मार्गाचे नियोजन करणे, इतर भागातील पात्र घरांचे स्थलांतर करणे, कुरार नाला पात्राचे रुंदीकरण करणे, येथील घरांचे 3/11 सारखी योजना राबवून स्थलांतर करणे, संस्कार कॉलेज येथील प्रस्तावित विकास नियोजन रस्ता विकसीत करणे, येथील बाधीत घरांचे पुनर्वसन करणे, पोईसर नदीच्या पात्रातील तसेच कुरार नाल्याच्या पात्रातील रुंदीकरणाच्या हद्दीत येणाऱ्या घरांना त्याच भागात घरे उपलब्ध करुन देणे आदी विविध प्रलंबीत विकास कामांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. 

आदित्य  ठाकरे म्हणाले की, या भागातील सर्व प्रलंबीत कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच प्रत्येक विकासकाम पूर्ण करण्यासाठी निश्चित वेळ निर्धारित करुन नियोजीत वेळेत कामे पूर्ण करण्यात यावीत. या विकास कामांच्या प्रगतीबाबत माहिती द्यावी. काही दिवसानंतर पुन्हा बैठक घेऊन कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.    

संबंधीत एमएमआरडीए, एसआरए, मुंबई महापालिका, वन विभाग यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील कामे जलदगतीने मार्गी लावल्यास बाधीतांचे पुनर्वसन होणे, विविध रस्त्यांची कामे मार्गी लागल्यास वाहतूक कोंडीतून सूटका होणार आहे. त्यामुळे ही कामे संबंधीत विभागांनी जलदगतीने मार्गी लावावीत, असे यावेळी आमदार  सुनिल प्रभू यांनी सांगितले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dindoshi: Complete the development work on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.