पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हालाही आले का? बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइलवरुन पाठवले संदेश...

By मनीषा म्हात्रे | Updated: August 26, 2022 16:58 IST2022-08-26T16:58:24+5:302022-08-26T16:58:32+5:30

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइल तयार करून अशा पद्धतीने गिफ्ट कार्ड पाठवल्याचा प्रताप समोर आला आहे.

Did you get the Police Commissioner's gift card? Messages sent from fake WhatsApp profiles | पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हालाही आले का? बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइलवरुन पाठवले संदेश...

पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हालाही आले का? बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइलवरुन पाठवले संदेश...

मुंबई : एका खरेदी विक्री संकेतस्थळाचे गिफ्ट कार्ड देण्याचा संदेश चक्क पोलीस आयुक्तांच्या नावे अधिकाऱ्यांना आल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या. मात्र, चौकशीत सायबर ठगांने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइल तयार करून अशा पद्धतीने गिफ्ट कार्ड पाठवल्याचा प्रताप समोर आला आहे. अशा कुठल्याही संदेशाला बळी पडू नका असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आरोपीनी फणसळकर यांच्या संपर्क यादीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संदेश पाठवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. फणसळकर यांचे छायाचित्र भामट्यांनी व्हॉट्सअॅप प्रोफाईल म्हणून ठेवले. मात्र, कोणीही या फसवणूकीला बळी पडले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी फसवणूक टोळीने तयार केलेला संदेश प्रसारित केला आणि सर्व पोलीस अधिकारी आणि नागरिकांना या फसवणूकीला बळी न पडण्याचे आवाहन केले असल्याचे उपायुक्त(अभियान) संजय लाटकर यांनी सांगितले. यापूर्वी सायबर ठगांकडून पोलीस महासंचालक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, आयकर विभागाचे मुंबई प्रमुख, महावितरणचे एमडी, वरिष्ठ आयएएस, आयपीएस आणि आयआरएस अधिकाऱ्यांना याच पद्धतीचा वापर करून फसणूक करण्याचा प्रयत्न केला होता.

संदेशात नेमके काय ?

९३२९६०३२९४ या मोबाईल क्रमांकाचा अनोळखी मोबाईल धारकाने स्वतःचे व्हॉटस् अॅप डी. पी. वर पोलीस आयुक्तांचा गणवेषातील फोटो ठेवला आहे. त्याआधारे पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे नावे 'अॅमेझॉन पे ई गिफ्ट विथ १०००० व्हॅल्यू' ची मागणी करीत असून ते गिफ्ट लवकरात लवकर देण्याची विनंती करीत आहे. त्यामुळे अशाप्रकारे गिफ्ट अथवा इतर कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्याचा संदेश प्राप्त झाल्यास अथवा निदर्शनास आल्यास त्याला प्रतिसाद देवू नये. मुंबई पोलीस या संदर्भात कायदेशिर कारवाई करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Did you get the Police Commissioner's gift card? Messages sent from fake WhatsApp profiles