Join us  

धाराशिवमध्ये महायुतीकडून 'अर्चना पाटील'; पती भाजपा आमदार, पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 4:52 PM

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. 

मुंबई/धाराशिव - राज्यात गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील काही जागांवरुन वाद होता. महायुतीमधील धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असल्याने अजित पवार या जागेसाठी आग्रही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अखेर धाराशिव लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा केली. धाराशिवमधून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांचं त्यांना आव्हान असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. 

महायुतीमध्ये हा मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून या ठिकाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्चना पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुनिल तटकरे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या पंधरा दिवसापासून महायुतीच्या जागा वाटपात धाराशिव लोकसभेचा मतदारसंघावर शिवसेना भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाने आपला दावा सांगितला होता. दररोज नवीन नाव चर्चेसाठी पुढे येत होते. मात्र मागील तीन-चार दिवसापासून चर्चेच्या हालचालींना वेग आला होता. अखेर आज उमेदवाराची घोषणा झाली.  

धाराशिव मतदार संघातील प्रमुख नेते मंडळींची उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन दिवस  झालेल्या चर्चेनंतर अर्चना पाटील यांचे नाव अंतिम झाले. त्यामुळे, धाराशिव लोकसभा मतदारसंघात आता ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा सामना रंगणार आहे. अर्चना पाटील ह्या भाजपा नेते आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे, पती भाजपाचे आमदार, तर पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार अशी परिस्थिती धाराशिव लोकसभा मतदारसंघात दिसून येत आहे.  

टॅग्स :उस्मानाबादसुनील तटकरेराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूक २०२४