Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंनी राजीनामा दिला, आम्ही नाही पाहिला; विरोधकांचा सभात्याग, पटोलेंकडून मुद्दा उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 05:56 IST

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण सभागृहाला त्याची साधी माहितीही दिली जात नसल्याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानसभेत सभात्याग केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पण सभागृहाला त्याची साधी माहितीही दिली जात नसल्याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी शुक्रवारी विधानसभेत सभात्याग केला. 

मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर केली. अधिवेशन सुरू असताना सभागृहात त्याची माहिती देणे आवश्यक होते. तो सभागृहाचा अधिकार आहे. याची माहिती आधी आम्हाला का दिली नाही, अशी विचारणा विरोधकांनी केली. त्यावर तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी राजीनाम्याची माहिती सभागृहात देण्याची प्रथा नसल्याचे स्पष्ट केले. 

पटाेलेंकडून मुद्दा उपस्थित

प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय उपस्थित केला. मंत्री राजीनामा देतात. मुख्यमंत्री फडणवीस हे त्याची घोषणा माध्यमांसमोर करतात. अधिवेशन सुरू असताना आधी त्याची माहिती विधानसभेत देणे आवश्यक होते, असे पटोले म्हणाले.

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा होतो पण त्याची माहिती माध्यमांना आधी दिली जाते. मग सभागृहात मंत्र्यांचा परिचय का दिला जातो; तेही बंद करून टाका, असा उद्वेग व्यक्त केला. त्यावर संजय केळकर यांनी माहिती घेऊन सभागृहात सांगू असे स्पष्ट केले. मात्र विरोधकांचे या उत्तराने समाधान झाले नाही. 

 

टॅग्स :विधानसभाधनंजय मुंडेमहायुतीमहाराष्ट्र विकास आघाडीमहाविकास आघाडी