dhananjay munde help to Mangesh, who wrote the essay 'My Dad' | 'माझे पप्पा' निबंध लिहिणाऱ्या मंगेशच्या वेदना पालकमंत्री मुंडेंनी जाणल्या
'माझे पप्पा' निबंध लिहिणाऱ्या मंगेशच्या वेदना पालकमंत्री मुंडेंनी जाणल्या

मुंबई - शाळेतील शिक्षकांच्या आज्ञेनुसार आपल्या वडिलांवर निबंध लिहिणाऱ्या चौथीतील चिमुकल्याने सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभारले. सोशल मीडियावर या शाळकरी मुलाचा वहीवर लिहिलेला निबंध व्हायरल झाला होता. वाचणाऱ्याच्या काळजाचं पाणी करणारा हा निबंध मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. विशेष म्हणजे याची सत्यताही तपासण्यात आली. आता, खुद्द सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीच या निबंधाची दखल घेतली आहे.

महाराष्ट्राचे मंत्री असलेले धनंजय मुंडे हे बीड जिल्हावासियांचे आणि निकटवर्तीयांचे धनुभाऊच आहेत. त्यामुळेच, धनंजय मुंडेंनी पालक बनून बीड जिल्ह्यातील मंगेशच्या निबंधाची दखल घेत, त्याच्या कुटुंबीयास मदतीचा हात दिला. "माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो..... अशा आशयाने सुरुवात असलेल्या या निबंधाची दखल धनंजय मुंडेंनी घेतली आहे. 

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी या छोट्याशा गावातील चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मंगेशचा माझे पप्पा हा भावनिक निबंध मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर, आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याची दखल घेत, संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागाकडून दीड लाखांचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. तसेच, दिव्यांग कल्याण निधीतून इतरही मदत उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मंगेशच्या वडिलांचे छत्र हरवले असून मंगेशची आई दिव्यांग आहे. अशा परिस्थितीही मंगेशची शिक्षणातील गोडी निबंधातून दिसून आली. त्यामुळेच, मंगेशबद्दल अनेकांनी हळहळ आणि संवेदना व्यक्त केल्या.    
मंगेशच्या वडिलांचं क्षयरोगानं (टीबी) गेल्या महिन्यात निधन झालं. वडिलाच्या दुखातून अजून त्याचं कुटुंब सावरलेलं नाही. अशातच चौथीत असलेल्या मंगेशवर 'माझे वडील' या विषयावर निबंध लिहिण्याची वेळ आली तेंव्हा वडील गेल्यानंतर मंगेशनं स्वतःला होत असलेल्या झालेल्या वेदनांना निबंधातून वाट मोकळी करून दिली. त्याच्या शिक्षिकेनं जेव्हा मंगेशनं लिहिलेला निबंध वाचला, तेव्हा त्यांनाही रडू आवरलं नाही. मंगेशचा हा निबंध सोशल माध्यमातून व्हायरल झालाय.
 

Web Title: dhananjay munde help to Mangesh, who wrote the essay 'My Dad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.