Dhananjay Munde got Abhay, Sharad Pawar followed suit | धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण

धनंजय मुंडे यांना मिळाले अभय, शरद पवार यांनी केली पाठराखण

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 'सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रारीचे स्वरूप गंभीर आहे. त्यांची पक्षाने नोंद घेतलीय, असे काल मी स्वत: बोललो होतो. मात्र, आता वेगळे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. त्यानंतरच पक्ष पुढील निर्णय घेईल,' असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता तूर्त फेटाळून लावली आहे.

एका तरुणीने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत तशी तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. तसे संकेतही पक्षाचे नेते शरद पवार यांनी गुरुवारी दिले होते. मात्र भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसेचे विभाग प्रमुख मनीष धुरी यांनी ‘त्या’ तरुणी विरोधात पोलिसांकडे धाव घेतल्याने मुंडे यांच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. पत्रकारांशी बोलताना  पवार म्हणाले, मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी इतर काही गोष्टी पुढे आल्या 

आहेत. भाजप आणि अन्य पक्षाचे नेते देखील सदर महिलेसंबंधी आरोप करत आहेत. वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल काय, असे विचारले असता, मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नेमकी काय माहिती दिली आहे, याची मला माहिती नाही. त्या तांत्रिक बाबी आहेत. देशात यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे झालीत. अत्युच्च पातळीवरील लोकांकडूनही झाली आहेत. मी त्या खोलात जाऊ इच्छित नाही,' असं सूचक वक्तव्यही खा. पवार यांनी केले.

मुंडे यांचा चौकशीविना राजीनामा घेणे योग्य नाही.  चौकशीतून जे समोर येईल त्यानुसार कारवाई करायची की नाही हे ठरेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या नेत्यांच्या पाठीमागे पक्ष खंबीरपणे उभा राहतो, भाजपसारखे आम्ही ओबीसी नेत्यांना वाऱ्यावर सोडत नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

‘तुमची इच्छा असेल तर मी माघार घेते’
मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार तरुणीही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. तिच्यावर केलेले सर्व आरोप तिने फेटाळले आहेत. तसेच ‘तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते’, असे ट्विट तिने केले आहे.

‘मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का आले नाहीत? मला हटविण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
तरुणीच्या वकिलांना धमकीचे कॉल
तरुणीचे वकील रमेश त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत तरुणीवर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले. तसेच आपल्याला धमकीचे कॉल येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Dhananjay Munde got Abhay, Sharad Pawar followed suit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.