dhananjay munde comments on bjp government | ...तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते- धनंजय मुंडे
...तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते- धनंजय मुंडे

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एमटीएनएल, बीएसएनएलला लवकरच टाळं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

बीएसएनएल, एमटीएनएल आर्थिक संकटात सापडल्या आहेत. लाखो कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा घाट सरकारने घातलाय. सरकारने जिओवर जितकं प्रेम दाखवले त्यातले अर्धे प्रेम जरी #BSNL , #MTNL वर दाखवले असते तर लाखो कर्मचाऱ्यांचे संसार वाचले असते. या सरकारला धनदांडग्यांची पडलीय. #YehKaisaVikasHai, असं म्हणत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

दुसरीकडे याबद्दलची शिफारस अर्थ मंत्रालयाकडून सरकारला करण्यात आली आहे. सरकारी मालकीच्या एमटीएनएल, बीएसएनएलला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागानं अर्थ मंत्रालयाला प्रस्ताव दिला होता. सरकारी मालकीच्या कंपन्या असलेल्या एमटीएनएल, बीएसएनएल आर्थिक संकटात आहेत. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी दूरसंचार विभागानं अर्थ मंत्रालयाकडे 74 हजार कोटींची मागणी केली होती. या दोन्ही कंपन्यांवर सध्या 95 हजार कोटींचा अर्थभार आहे.

या दोन्ही कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या 1.65 लाखांपेक्षा जास्त आहे. दोन्ही कंपन्यांच्या एकत्रीकरणाचा प्रस्तावदेखील बारगळला आहे. या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना अन्यत्र सामावून घेण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये तीन प्रकारचे कर्मचारी आहेत. यातील पहिला वर्ग कंपनीकडून थेट नियुक्ती झालेल्यांचा आहे. तर दुसऱ्या प्रकारातील कर्मचारी दुसऱ्या पीएसयू किंवा विभागांमधून बीएसएनएल, एमटीएनएलमध्ये आले आहेत. तिसऱ्या प्रकारातील कर्मचारी भारतीय दूरसंचार सेवेतील आहेत. तिसऱ्या वर्गातील अनेकजण सध्या अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

बीएसएनएल, एमटीएनएल बंद करण्याचा निर्णय झाल्यास अधिकारी वर्गाला सरकारच्या अन्य कंपन्यांमध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं. बीएसएनएल, एमटीएनएलकडून थेट नियुक्ती झालेले बहुतांश कर्मचारी कनिष्ठ पातळीवर काम करतात. त्यांचं वेतनदेखील फारसं नाही. संपूर्ण कंपनीतील त्यांचं प्रमाणदेखील 10  टक्क्यांच्या आसपास आहे. या व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांना कंपनी सक्तीनं निवृत्ती घेण्यास सांगू शकते.

Web Title: dhananjay munde comments on bjp government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.