Join us

धनुभाऊ ते आदित्य ठाकरे...कुणाला कुणाची 'लेन्स'? पवारांसमोरच धनंजय अन् पंकजा मुंडेंची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:43 IST

सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर असतील आणि शाब्दीक तीर पाहायला मिळाले नाहीत तर नवलच.

मुंबई-

सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर असतील आणि शाब्दीक तीर पाहायला मिळाले नाहीत तर नवलच. मुंबईत प्रभादेवी येथे आज डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाचं उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्वपक्षीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बंधू-भगिणींनी एकमेकांवर सोडलेले शाब्दीक तीर चर्चेचा विषय ठरले. 

नेत्रालयाच्या उदघाटनाचं निमित्त साधून पंकजा मुंडे यांनी 'लेन्स' या शब्दावरुन धनंजय मुंडे यांच्यावर टोलेबाजी केली. "ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस चांगल्या आहेत असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतात आणि जे सोबर अन् प्रेमळ वागतात असे बाळासाहेब थोरात...एक नवीन चेहरा आणि ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे असे आदित्य ठाकरे...आमचे शेजारी विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेले अमित देशमुख...मुंडे-महाजनांच्या लेन्समधून स्वत:ला मोठं करत पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघणारे धनंजय मुंडे", अशी कोटी करत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. 

धनंजय मुंडेंनीही दिलं प्रत्युत्तरपंकजा मुंडेंच्या टोलेबाजीला धनंजय मुंडे यांनीही मिश्किल कोटी करत उत्तर दिलं.  "पंकजाताई कधीतरी अशा लेन्सेसच्या फोकसमध्ये यावं लागतं. आता आम्ही व आदित्य ठाकरे बसलो होतो आणि बोलत होतो की कदाचित ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर बरं होईल. असं ते बोलत होते मी नाही. गमतीचा भाग सोडून द्या पण हे खरं आहे की बीड जिल्ह्यात आमचं बहिण-भावाचं कितीही राजकीय वैर असलं तरी काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांच्यासाठी आमचं वैर वगैरे काही नाही. आमच्यासाठी त्या व्यक्ती मोठ्या आहेत. त्यापैकी डॉ. तात्याराव लहाने आहेत", असं धनंजय मुंडे म्हणाले. 

टॅग्स :धनंजय मुंडेपंकजा मुंडेशरद पवार