Join us  

गणपत गायकवाडांवर फडणवीस कारवाई करणार?; भेटीनंतर शंभुराज देसाईंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 3:25 PM

गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Shivsena Shambhuraj Desai ( Marathi News ) : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. तसंच गोळीबारानंतर गणपत गायकवाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर घणाघाती आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आमदार गायकवाड यांच्या या कृत्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली असून गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली आहे.

"शिवसेनेचे जे मंत्री आजच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित होते, ते आम्ही सर्व मंत्री बैठकीआधी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. उल्हासनगरमध्ये झालेली गोळीबाराची घटना वेगळी आहे, मात्र भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जे तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले त्याबद्दल आम्ही आमचं मत देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडलं. घडलेला प्रकार चुकीचा असून त्याबाबत कार्यवाही करावी, अशी भूमिका आम्ही मांडली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील," असं शंभुराज देसाई म्हणाले.

दरम्यान, "मी महायुतीच्या समन्वय समितीचा सदस्य आणि भाजप आमदार गणपत गायकवाड हे ज्या जिल्ह्यातील आहेत त्या ठाणे जिल्हाचा मी पालकमंत्रीही आहे. मात्र याआधी कधीही आमदार गायकवाड यांनी माझ्याकडे हा विषय मांडला नाही. गणपत गायकवाड यांनी काल पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे," असंही देसाई म्हणाले.

"नियमित बैठका होणार"

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याने महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याची टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नियमित बैठका होणार असल्याचं शंभुराज देसाई यांनी स्ष्ट केलं आहे. "महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठका नियमित होत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत काही कारणास्तव ही बैठक झाली नव्हती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही नेते पुढील दोन दिवसांत एकत्र बसून समन्वय समितीच्या बैठका कशा प्रकारे व्हायला हव्यात, याबाबत धोरण निश्चित करतील," असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना काय म्हणाले होते गणपत गायकवाड?

माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत म्हटलं होतं की, "एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि ते भाजपसोबतही गद्दारीच करणार आहेत. एकनाथ शिंदेंकडे माझे करोडो रुपये बाकी आहेत. ते जर देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की, गणपत गायकवाडचे माझ्याकडे किती पैसे बाकी आहेत. माझे एवढे पैसे खाऊनही ते माझ्याविरोधातच काम करत आहेत. याप्रकरणी आता कोर्ट जो निर्णय देईल ते मला मान्य असेल. महाराष्ट्रात यापुढे गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील. मात्र माझी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती असेल की शिंदेंचा राजीनामा घ्या," असं गायकवाड म्हणाले होते.

 

टॅग्स :शंभूराज देसाईदेवेंद्र फडणवीसभाजपाएकनाथ शिंदेगणपत गायकवाडमहेश गायकवाड