Join us

"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 18:32 IST

Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : सरकारचा नेहमीचा प्रयत्न असतो की गोष्टी सामंजस्याने सुटाव्यात, असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : २९ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आंदोलनाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. हायकोर्टाने उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता, इतर सर्व ठिकाणाहून मराठा आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, काही ठिकाणी घडलेल्या अनुचित प्रकाराबद्दल तीव्र शब्दांत नाराजीही व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. यातून मार्ग कसा काढता येईल, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला दिला.

तर लवकर मार्ग निघेल...

"आम्ही आंदोलकांना सांगत आहोत की चर्चेतून मार्ग निघू शकतो. तुमचे जर शिष्टमंडळ असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो. पण आम्ही चर्चा कुणाशी करायची हाच प्रश्न आहे. माइक वर चर्चा करा, अशी चर्चा होते का? तरीही त्यांच्याकडून काही आलं तर आम्ही त्यावर विचार करतोय. त्यांनी एक निवेदन दिले आहे, त्यावर आमची चर्चा सुरू आहे. त्यातून काय मार्ग निघू शकतो तेदेखील आम्ही पाहत आहोत. सरकारला कुठलीही आडमुठेपणाची भूमिका घेता येत नसते. सरकार कधीही कुठलाही इगो धरत नाही. त्यामुळे आम्ही त्यातून जो मार्ग निघू शकतो, तो काढण्याचा प्रयत्न करत आहोत. जर चर्चेला कुणी समोर आले, तर त्यातून लवकर मार्ग निघू शकेल," असा प्रामाणिक सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सुप्रिया सुळेंनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की...

"सुप्रिया सुळे यांच्यासहित सर्वांना माझी अशी विनंती आहे की, अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणे बंद करा. कारण त्यातून आपलंच तोंड पोळतं. सुप्रिया सुळे यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मराठा समाजाचे प्रश्न इतके का चिघळले? त्यावर सोल्युशन कोणी काढले? त्यांनी एकदाही मराठा समाजाच्या बाजूने कोणताही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणाचे आणि मराठ्यांच्या बाजूचे निर्णय हे आमच्या सरकारने घेतलेत. मी आणि शिंदे साहेबांनी याबाबतचे निर्णय घेतले. आता पुन्हा आमचे सरकार निर्णय घेत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपली राजकीय पोळी भाजणं बंद केलं पाहिजे," अशी टीका फडणवीसांनी केली.

आंदोलकांच्या अशा वर्तणुकीमुळे छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय...

"कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली असे म्हणता येणार नाही. कारण बऱ्याच ठिकाणी रास्ता रोको किंवा गाड्या अडवण्याचे प्रकार झाले. पण आमच्या पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच त्यांना बाजूला करून लोकांची गैरसोय थांबवली. आंदोलकांकडून अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नाही. पण जर आता अशा वर्तणुकीचाही समर्थन होणार असेल, तर महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या दिशेने चाललीये याचा आपण विचार करायला हवा. आंदोलकांच्या अशा वर्तणुकीमुळे छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. उच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली आहे. सरकारचा प्रयत्न असतो की गोष्टी सामंजस्याने सुटाव्यात. पण आता न्यायालयाने कडक शब्दात आदेश दिल्याने, ज्या प्रकारची कारवाई अपेक्षित आहे तशी कारवाई प्रशासनाला करावीच लागेल," असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावले.

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलदेवेंद्र फडणवीसमुंबईमुंबई हायकोर्टमराठा आरक्षण