यदु जोशी
मुंबई :देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले, राज्यात महायुतीची सत्ता आली ही माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वांत मोठी उपलब्धी होती, अशी भावना भाजपचे मावळते प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. १२ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदेशाध्यक्ष झालेले बावनकुळे हे १ जुलै रोजी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपुर्द करणार आहेत. यानिमित्त ‘लोकमत’शी बावनकुळे यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांनी दिलखुलास चर्चा केली.
लोकसभेला आलेले अपयश आणि विधानसभेतील प्रचंड यश याकडे आपण कसे पाहता?
बावनकुळे : लोकसभेच्या पराभवाची सल अजूनही मनात आहे. मात्र, ती खंत आम्ही २०२९ मध्ये नक्कीच दूर करू. विधानसभेला भाजपला ५१.७८ टक्के मते मिळाली. तेवढीच मते २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळविण्याचे आमचे लक्ष्य असेल. मी प्रदेशाध्यक्ष झालो त्याच दिवशी भाजपच्या प्रमुख नेत्यांची अमरावतीत बैठक घेतली आणि फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असा निर्धार केला. तो सत्यात उतरला हे माझ्या २ वर्षे ११ महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील सर्वांत मोठे यश.
प्रदेशााध्यक्ष म्हणून आपली कामाची पद्धत कशी होती?
बावनकुळे : आमचे नेते अमित शाह यांनी सांगितले होते, ‘प्रवास आणि संवाद’ यावर भर द्या. त्याचे पालन करत मी विधानसभेच्या २८८ मतदारसंघांमध्ये किमान चार वेळा फिरलो. संवाद म्हणजे केवळ मी बोलणार असे नाही, तर प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. मी या तीन वर्षांत केवळ २७ दिवस माझ्या गावी; घरी राहिलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मंत्र आम्हाला दिला होता, की जातीपातींपलीकडे महाराष्ट्राचे राजकारण घेऊन जा, त्यावर आम्ही काम केले. पक्षसंघटनेने नेत्याच्या मागे ताकद उभी केली पाहिजे हाही मोदी यांचा मूलमंत्र आहे; आम्ही तेच केले.
यापढे स्वत:ला मंत्रिपदाच्या जबाबदारीतच बांधून घेणार की पक्षसंघटनेतही योगदान देणार?
बावनकुळे : मंत्रिपदाला न्याय देतानाच माझे नेते देवेंद्र फडणवीस आणि नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देतील ती जबाबदारी मन लावून निभावणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत १३ हजार पक्ष कार्यकर्ते, दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील नेत्यांना निवडून आणणे हे आगामी काळात सर्वांत मोठे आव्हान असेल. रवींद्र चव्हाण मेहनती आणि आक्रमक आहेत, ते पक्षाला आणखी पुढे नेतील हा माझा विश्वास आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तेही भाजपला उंचीवर नेतील यात कसलीही शंका नाही.