Join us

...'त्या' पोलिसांना सेवेतून मुक्त करा, महिला अत्याचारावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:05 IST

अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र

मुंबई - अहमदनगर जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटनेबाबत आज विधानसभेत आवाज उठविण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित आरोपींवर आजच्या आज गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, या गुन्ह्यातील आरोपींमध्ये एका पोलिसाचा सहभाग आहे. त्या पोलिसाला सेवेतून मुक्त करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. अहमदनगरमधील घटनेचा निषेध नोंदवत याविषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन करावे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पीडितेचा सख्खा भाऊ, चुलत सासरा व दोन दिराचा समावेश आहे. याप्रकरणी सदर पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, अपहरण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी चौकशीसाठी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये अत्याचाराची फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथून पीडित महिला व तिच्या पतीला रिक्षात बसविले. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन आरोपींनी त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी दहा जणांनी त्यांना विवस्त्र केले. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून पती-पत्नीला मारहाण केल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी. मुलानी हे पुढील तपास करीत आहेत. सदर महिलेला मारहाण करताना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोमवारी  व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी सदर महिलेशी संपर्क करून तिची फिर्याद दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवला. याप्रकरणात पोलिसांचाही समावेश आहे, काय चाललंय हे राज्यात? पोलीस करतात काय?असे म्हणत फडणवीस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच, संबंधित विषयाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सभागृह संपायच्या आत, निवेदन दिलं पाहिजे. तसेच, संबंधित पोलीस आणि त्यांस पाठिशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर 311 अंतर्गत कारवाई करुन त्यांना सेवेतून मुक्त करावे, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.  

टॅग्स :अहमदनगरगुन्हेगारीपोलिसदेवेंद्र फडणवीस