देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त; इतिहासात प्रथमच नियुक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 06:24 IST2023-01-05T06:23:46+5:302023-01-05T06:24:07+5:30
भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचीही आयुक्तालयात चर्चा आहे.

देवेन भारती मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त; इतिहासात प्रथमच नियुक्ती!
मुंबई : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच विशेष पोलिस आयुक्तपद निर्माण करण्यात आले आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार विशेष पोलिस आयुक्त हे पोलिस आयुक्तांना रिपोर्ट करत, सर्व पोलिस सहआयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करणार आहेत. भारती हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचीही आयुक्तालयात चर्चा आहे.
देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मुंबई पोलिस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. मात्र, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देवेन भारती यांची वाहतूक विभागात सहआयुक्तपदी नियुक्ती केली गेली. बदलीच्या सव्वा महिन्यानंतर त्यांची अप्पर पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली होती.
कशासाठी केली या पदाची निर्मिती?
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रशासकीय निकड म्हणून पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली पोलिस सहआयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी 'अपर पोलिस महासंचालक' दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेत या पदाची निर्मिती केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.