दुपटीने नोंदणी होऊनही आयटीआयचे केवळ ३१% प्रवेश निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 01:42 IST2020-09-17T01:41:32+5:302020-09-17T01:42:17+5:30
आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या होत्या. मात्र त्यातील फक्त २७ हजार ३२२ जागांवर विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशनिश्चिती केली आहे.

दुपटीने नोंदणी होऊनही आयटीआयचे केवळ ३१% प्रवेश निश्चित
मुंबई : राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी दुपटीने अर्जनोंदणी झाली होती. मात्र आयटीआय प्रवेशासाठी पार पडलेल्या पहिल्या फेरीत राज्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ३१ टक्के विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. आयटीआयच्या पहिल्या फेरीमध्ये ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना जागा अलॉट झाल्या होत्या. मात्र त्यातील फक्त २७ हजार ३२२ जागांवर विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशनिश्चिती केली आहे.
राज्यातील पहिल्या फेरीतील प्रवेशाचे हे एकूण प्रमाण ३१.०३ टक्के आहे. यातील शासकीय आयटीआयमध्ये २९.४३ टक्के तर खाजगी आयटीआयमध्ये ३८.४६ टक्के प्रवेश झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीचा फटका अकरावी आणि इतर प्रवेश प्रक्रियांप्रमाणे आयटीआय प्रवेशालाही बसला आहे. १४ सप्टेंबर रोजी पहिली फेरी संपुष्टात आल्यानंतर या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. शासन स्तरावर शैक्षणिक विभागातील मराठा आरक्षणावर निर्णय झाल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल, असे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यादरम्यान विद्यार्थ्यांना नवीन अर्ज भरता येणार आहे; तसेच अर्जात बदल करण्याची मुभा असणार आहे. राज्यभरात यंदा ३ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या वर्षी १ लाख ४५ हजार ५३२ जागा उपलब्ध आहे. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार ७५२ जागा तर खाजगी आयटीआयमध्ये ५३ हजार २१६ जागा आहेत. शासकीय आयटीआयमध्ये २१ हजार ३४८ तर खाजगी आयटीआयमध्ये ५ हजार ९७४ प्रवेश निश्चित झाले आहेत.
शासकीय खाजगी एकूण
आयटीआय आयटीआय
क्षमता ९२७५२ ५३२१६ १४५९६८
पहिली फेरी अलॉट ७२ ५२६ १५५३४ ८८०६०
पहिली फेरी प्रवेश निश्चित २१३४८ ५९७४ २७३२२
टक्केवारी एकूण २९.४३ % ३८.४६% ३१.०३%