“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 20:24 IST2025-07-08T20:21:53+5:302025-07-08T20:24:39+5:30

Deputy CM Eknath Shinde: आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

deputy cm eknath shinde said senior artist manmohan mahimkar will not become homeless | “ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही

Deputy CM Eknath Shinde: मराठी सिनेमामध्ये भूमिका केलेले ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झाले तरीही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिमकर यांना दिली आहे. 

मनमोहन माहिमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे आणि इतर अनेक सिनेमामध्ये काम केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना कामे मिळेनाशी झाली होती. त्यातच गिरगावात पागडीवर वास्तव्यास असताना त्यांची इमारतिचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मालकाने घेतला. मात्र इमारतीचा पुनर्विकास होणार हे कळताच त्यांच्याच नातेवाईकांनी या घरावर दावा सांगितला. या वादामुळे त्यांना विकासकाकडून मिळणारे भाडे बंद झाले. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत अडकलेल्या माहिमकर यांनी व्यथित होऊन त्यांनी राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला होता. आपण आर्थिक विवंचनेत असून आपल्या मागेपुढे कुणीही नाही तसेच आपल्याकडे या वयात अर्थार्जनाचे कोणतेही साधन नसल्याने आपल्याला इच्छामरण करण्यास परवानगी द्यावी, असे त्यांनी आपल्या अर्जात लिहिले होते. 

याबाबत विविध माध्यमातून बातम्या आल्यानंतर शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी येथील बंगल्यावर त्यांनी माहिमकर यांची भेट घडवून दिली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी माहिमकर यांचे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सदर घर माहिमकर यांनाच मिळवून देण्याचे निर्देश दिले. तसेच आम्ही आपल्या सोबत असून काहीही करून तुम्हाला बेघर होऊ देणार नाही असेही सांगितले. शिंदे यांनी आपले म्हणणे ऐकून घेतले तसेच आपले म्हणणे ऐकून तत्काळ आपल्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांचे आभार मानले. 

माहिमकर यांच्या घराचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळायला हवा अशी आमची प्रामाणिक भूमिका होती. याबाबत अनेक बातम्या आमच्यापर्यंत आल्या होत्या त्यांची दखल घेऊन चित्रपट सेनेने माहिमकर यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून आणली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांचा विषय समजून घेऊन त्यांना मदत केली. मराठी कलाकारांच्या मदतीला उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच तत्पर असतात. मनमोहन माहिमकर यांच्या निमित्ताने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार यांनी व्यक्त केले आहे.

 

Web Title: deputy cm eknath shinde said senior artist manmohan mahimkar will not become homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.