Join us

भाजपा नेत्याच्या अटकेचा प्लान, एकनाथ शिंदेंकडून गौप्यस्फोट; म्हणाले, “टांगा पलटी करुन टाकला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 10:18 IST

DCM Eknath Shinde News: मुंबई बँकही आता जनतेची माझी लाडकी बँक झाली आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

DCM Eknath Shinde News: बँक चालवताना सर्वसामान्यांचे हित घेऊन चालवावी लागते. तुम्ही ते करत आहात. लाडक्या बहिणींची काळजी घेतली म्हणून ही मुंबई बँक देखील आमची लाडकी झाली आहे. मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांना सांगितले होते की, मुंबईचा मुंबईकर बेघर झाला आहे. अशा मुंबईकरना पुन्हा आणायचे असेल तर SRA प्रकल्प राबवायचे. स्वयंपूर्णविकास हे मुंबईसाठी वरदान ठरेल. बाळासाहेबांनी तेव्हा सांगितले होत की, ४० लाख झोपडपट्टीवासियांना घर देऊ. मात्र तेव्हा टिंगल उडवली. महायुती सरकार हे स्वप्न पूर्ण करणार, अशी गॅरंटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुंबई शहरातील अभ्युदय नगर येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बँकेला शुभेच्छा देतानाच त्यांच्या सर्व उपक्रमांना शासन नक्की सहकार्य करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, संचालक प्रसाद लाड, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी नगरसेविका आशा मामेडी तसेच अभ्युदय नगर परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

प्रवीण दरेकर यांना अटक करायची इथपर्यंत मजल गेली होती

महाविकास आघाडीच्या काळात चुना लागला. मराठी माणसाला उभे करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली. प्रवीण दरेकर तुमचीही चौकशी लावली होती. मी तेव्हा तिथे सरकारमध्ये होतो, त्यामुळे मला माहिती आहे. मुंबई बँकेला जेरीस आणायचे असेही ठरवले होते. प्रवीण दरेकर यांना अटक करायची इथपर्यंतही मजल गेली, असा गौप्यस्फोट करत, यात आणखी बऱ्याच लोकांची नावे होती. पण मला कळले की, हे सर्व पापाचे काम चालले आहे, पापाचा धनी होता कामा नये, म्हणून मी माझा स्पीड वाढवला आणि टांगा पलटी करुन टाकला, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई बँकही आता माझी लाडकी बँक झाली

५० वर्षांमध्ये ५० शाखा हा टप्पा ग्राहकांचा विश्वास सार्थ ठरवल्यामुळेच मुंबई बँकेला शक्य झाले असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात ग्रोथ आणणारी ही बँक आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना २५ हजारांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय या बँकेने घेतला असून त्यामुळे मुंबई बँकही आता माझी लाडकी बँक झाली असल्याचे गौरवोद्गार एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

दरम्यान, या अभ्युदय नगरचा पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित असून याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी नमूद केले. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी ७ शासकीय यंत्रणांना एकत्रित आणून हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत राहायला यावा यासाठी आमचे प्रयत्न असून निवडणुकीपुरता मराठी माणूस न आठवता त्यांचे प्रश्न सोडवून कायमस्वरूपी त्यांच्या मनात घर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

टॅग्स :एकनाथ शिंदेप्रवीण दरेकरमहायुती