Join us

“नाचता येईना अंगण वाकडे”; राहुल गांधींच्या टीकेवर DCM एकनाथ शिंदेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:32 IST

Deputy CM Eknath Shinde Replied Rahul Gandhi: विरोधक पराभव स्वीकारायच्या आणि त्या धक्क्यातून बाहेर यायच्या मानसिकतेत नाहीत. जिंकले की ईव्हीएम चांगले आणि हरले की ईव्हीएम खराब होते, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला.

Deputy CM Eknath Shinde Replied Rahul Gandhi: ईव्हीएम आणि मतदारांच्या संख्येच्या मुद्द्यावर दिल्लीत काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवरुन निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले. या पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनीही काही आकडेवारी मांडत भाजपा आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. याला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 

महाराष्ट्रात पाच वर्षांत जितक्या नव्या मतदारांची नोंद झाली नाही, त्यापेक्षा अधिक मतदार शेवटच्या पाच महिन्यांत नोंदवले गेले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ३९ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली. म्हणजे हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येपेक्षाही अधिक मतदार या कालावधीत नोंदवण्यात आले. हे मतदार नेमके आले कुठून? आम्ही मागील काही दिवसांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचा सविस्तर अभ्यास केला आहे. या निवडणुकीत काहीतरी गोंधळ नक्कीच झाला आहे. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये अनियमितता आढळली आहे, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी यावर पलटवार केला.

नाचता येईना अंगण वाकडे, जिंकले की ईव्हीएम चांगले अन् हरले की वाईट

मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो. मला काही जण विचारत होते की, ही कसली लाट आहे? यावर मी त्यांना सांगितले की, ही लाट नाही तर महालाट आहे. ही लाडक्या बहि‍णींची महालाट आहे. लाडक्या बहि‍णींनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून मतदान केले. लाडक्या भावांनाही करायला लावले. त्यामुळे विरोधकांना चित करून टाकले. ज्या सावत्र भावांनी लाडक्या बहि‍णींच्या योजनांमध्ये खोडा घातला होता, त्यांना चांगला जोडा लगावला. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना अजूनही त्यांचा जो पराभव झाला आहे, तो पचनी पडलेला नाही. ते पराभव मानायला तयार नाहीत. त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात, तेव्हा ईव्हीएम चांगले असते, जेव्हा हरतात, तेव्हा ईव्हीएम खराब होते. निवडणूक आयोगाला शिव्या देतात. आता तर मतदार याद्यांवरून आरोप करत आहेत. हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असे आहे, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांना ४४० व्होल्टचा करंट लागला. लोकांनी भरभरून मतदान केले. अडीच वर्ष जे आम्ही काम केले. महायुतीने काम केले, त्याचा हा परिपाक आहे. त्या कामांची लोकांनी पोचपावती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे काम देशभरात केले आहे, त्यामुळे यांना दिल्लीत पराभव दिसू लागला आहे. म्हणूनच आतापासून आरोप सुरू झाले आहेत, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. 

टॅग्स :एकनाथ शिंदेराहुल गांधीशिवसेनाकाँग्रेसभारतीय निवडणूक आयोगईव्हीएम मशीन