“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:20 IST2025-01-22T15:17:34+5:302025-01-22T15:20:37+5:30
Deputy CM Eknath Shinde News: आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील, पालकमंत्रीपद...”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: बीड, परभणी प्रकरणावरून अद्यापही अनेक घडामोडी घडत असून, बीड प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. यावरून विरोधकांकडून महायुती सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. दुसरीकडे, लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांच्या छाननीचा निर्णय आणि पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेली अंतर्गत धुसपूस यावरूनही विरोधक टोलेबाजी करत आहेत. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गोगावले समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे आता या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
CM देवेंद्र फडणवीस दावोसहून आल्यावर सगळे प्रश्न सुटतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर सर्व प्रश्न सुटतील. तुमचे जे प्रश्न आले आहेत, मग त्यामध्ये सरकार स्थापन होण्यापासून ते आतापर्यंतचे सर्व प्रश्न आम्ही सोडवले. आता पालकमंत्रिपदाचा प्रश्नही सुटेल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेची संकल्पना मांडल्यानंतर तत्कालीन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनी त्या योजनेला मान्यता दिली. आम्ही टीमवर्क म्हणून काम केले. आताही आमच्यात श्रेयवादाची लढाई नाही. लोकांच्या जीवनात आपण काय बदल घडवू शकतो. मला काय मिळणार यापेक्षा महाराष्ट्रातील जनतेला काय मिळेल? ही भावना ठेवून आम्ही अडीच वर्ष काम केले. आताही आम्ही टीम म्हणून काम करत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.