Join us
Daily Top 2Weekly Top 5

DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:05 IST

Deputy CM Eknath Shinde News: ठाकरे बंधू आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत. यातच एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले.

Deputy CM Eknath Shinde News: विधानसभा निवडणुकीनंतर नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाला. शिवसेना शिंदे गटानेही आपली लय कायम राखली. आता राज्यातील सर्व महापालिका निवडणुकीसाठी महायुती तयारीला लागली आहे. विशेष म्हणजे मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये भाजपा आणि शिंदेसेनेची युती होणार का, जागावाटपाचा काय फॉर्म्युला असणार, याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 

एकीकडे ठाकरे बंधूंची युती अधिकृतपणे जाहीर होत असताना महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीची भूमिका काय असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठकांचे सत्र सुरू होते. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यातही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडी घडत असतानाच एकनाथ शिंदे दादर येथे जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाला भेट देत अभिवादन केले.

DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर

गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः गुरुः देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना वंदन करत विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी सर्व शिवसेना नेते, मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष उपस्थित होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून दिली. शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधुंच्या महापालिका निवडणुकीतील युतीची घोषणा होत आहे. अखेर हे 'भाऊबंध' जाहीर होत असतानाच पुणे महापालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन पक्ष एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा करण्यात आल्याने काका-पुतणे मिलनाचा नवा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde at Balasaheb's memorial; alliance talks gain momentum before Thackeray reunion.

Web Summary : DCM Shinde visited Balasaheb Thackeray's memorial amid discussions about a BJP-Shinde Sena alliance for upcoming municipal elections, coinciding with speculation of a Thackeray brothers' reunion. Meetings are ongoing. NCP factions in Pune may unite.
टॅग्स :एकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशिवसेना