Join us
Daily Top 2Weekly Top 5

"न्याय प्रिय व्यक्ती सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत..."; शिंदेंनी केलं सरन्यायाधीशांचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:30 IST

न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे असं गौरवोद्गार उपमुख्यमंत्री शिंदेंनी काढले.

मुंबई -  न्याय प्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती 

या कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले की, आधी अवघा ९ टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे असं त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे करत यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल असं शिंदेंनी म्हटलं. 

या ऐतिहासिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख त्यांनी केला. देश आज सुरक्षित आहे, कारण आपल्या सीमांवर जवान दटून उभे आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होत आहे. हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत मजल मारली आणि त्यांच्या जीवनप्रवासाला प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरवले असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

तसेच कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजना, मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. २०२२ पासून राज्यात ३२ नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यात १४ अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहेत असं शिंदे म्हणाले.

दरम्यान, संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक न्याय प्रिय असतील, तरच लोकशाही अधिक बळकट होते असं सांगत कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Justice-loving leaders ensure democracy's safety: Shinde praises Chief Justice

Web Summary : Eknath Shinde lauded Chief Justice Suryakant, emphasizing that justice-minded individuals in high office safeguard democracy. He highlighted Maharashtra's improved conviction rate and efforts to enhance judicial infrastructure, advocating for a permanent bench in Kolhapur to expedite justice.
टॅग्स :एकनाथ शिंदेसर्वोच्च न्यायालयउच्च न्यायालय