Deputy CM Eknath Shinde News: मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यभरातील महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे मतदान होऊ शकते, असा कयास आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटानेही आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय पक्षांतून शिवसेना पक्षात सामील झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत संवाद साधला. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तयारीला लागण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिले. याबाबत एकनाथ शिंदे यांनी एक्सवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे.
कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी
महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गेल्या अडीच वर्षात केलेली रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, एसटीपी उभारणीची कामे, सुशोभीकरणाची कामे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, आरोग्य सुविधा वाढवण्याची कामे असतील, कोस्टल रोड, मेट्रोची अशा अनेक लोकोपयोगी कामांची माहिती त्यांना दिली. ही सर्व कामे या माजी नगरसेवकांना समजावून सांगितली आणि ती कामे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करत, मुंबई शहर आमूलाग्र बदलत असून ते खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपाला येत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण नुकतेच जाहीर केले आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती केली जाईल तसेच रखडलेल्या इमारतींचा शासकीय यंत्रणांच्या भागीदारीतून पुनर्विकास करण्यात येईल. ज्यामुळे मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येऊन राहू शकेल. या धोरणाची माहिती त्यांना यावेळी एकनाथ शिंदे यांनी करून दिली.
दरम्यान, त्यासोबतच त्यांच्या विभागातील प्रश्न, त्यांच्या अडचणी यादेखील जाणून घेतल्या आणि त्या सर्व नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू असे आशवस्त केले. तसेच जागा वाटपाचा निर्णय हे महायुतीतील तीन प्रमुख नेते घेतील, त्यामुळे याबाबत चर्चा करू नका. कोणीही मित्रपक्षांबद्दल किंवा युतीतील मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे टाळा. मित्रपक्षाविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी करू नका. मित्र पक्षातील संबध ताणले जातील, एकमेकांवरती कुरघोडी टाळण्यासाठी उत्तराला प्रतिउत्तर देताना काळजी घ्या, अशा काही सूचना एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.