Join us

'हे केवळ मूर्खपणाचं लक्षण'; देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा, उद्धव ठाकरेंनाही सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 18:27 IST

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

मुंबई: प्रभू श्रीराम हे बहुजनांचे होते, तसेच ते मांसाहारी होते, असं विधान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरुन राज्यासह देशात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाने देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य हे केवळ मूर्खपणाचं लक्षण आहे. प्रसिद्धी मिळण्यासाठी 'बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ', अशाप्रकारे ते नेहमी करत असतात. खरं म्हणजे प्रभू श्री राम हे सर्वांचेच आहे. बहुजनांचे आहेत, अभिजनांचे, दलितांचे, आदिवासींचे आहेत. मात्र कारण नसताना ते शाकाहारी, मांसाहारी आहेत, असं बोलून विनाकारण लोकांच्या भावनांना ठेच पोहचवण्याचं हे काम आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. 

विनाकारण वाद होईल, अशांतता निर्माण होईल, असं वागणं अत्यंत चुकीचं आहे. तसेच मला काही लोक स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवतात, ती लोक मौन साधून बसली आहे. यावर काही बोलायला तयार नाहीत, निषेधही व्यक्त करत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर देखील अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.  

...तर मी खेद व्यक्त करतो- जितेंद्र आव्हाड

प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसजितेंद्र आव्हाडउद्धव ठाकरेअयोध्याराम मंदिर